"अण्णासाहेब'मुळे हमाली करणारा तरुण बनला व्यावसायिक ! पण...

Dhere
Dhere

सोलापूर : लऊळ (ता. माढा) येथील येथील तरुण दत्तात्रय ढेरे. दत्तात्रयचे वडील कुर्डुवाडी बाजारपेठेत हमाली करायचे. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे दत्तात्रय शिक्षणासाठी केम (ता. करमाळा) येथील मावशीकडे गेला. तेथे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करत सोबत मावशीच्या आईस्क्रीम उत्पादनात मदत करायचा. त्याचे काका कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनच्या मालधक्‍क्‍यावर हमाली करायचे. पुढे काकांनी त्यांच्या हमालीचा बिल्ला दत्तात्रयच्या नावाने केला व तेथून दत्तात्रय कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनमध्ये हमाली करत आहे. 

बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दत्तात्रय त्याच्या काकांबरोबर रेल्वे स्टेशन आईस्क्रीम विकायला जायचा. काकाने त्यांच्या हमालीचा बिल्ला दत्तात्रयच्या नावे केल्यापासून दत्तात्रय कुर्डुवाडी मालधक्‍क्‍यावर हमाली करायचा. मात्र मावशीकडे आईस्क्रीम तयार करण्याची कला आत्मसात केल्याने आईस्क्रीम उत्पादक होण्याची इच्छाही मनी बाळगून होता. मात्र पैसा हाती नसल्याने त्याची इच्छा त्याच्या मनातच राहून गेली. हमाली करत त्याने बॅंकेत पैसा जमवला. मात्र आईस्क्रीम उत्पादनासाठी लागणाऱ्या मशिनरींच्या किमती लाखोंच्या घरात होती. या साठवलेल्या रकमेतून ही मशिनरी खरेदी करणे शक्‍य नव्हते. 

त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज अनुदान योजनेची माहिती मिळाली. मग त्याने त्यासाठी प्रयत्न केले. "अण्णासाहेब महामंडळा'चे जिल्हा समन्वयक योगेश वाघ यांना भेटून त्याने "एलओआय' मिळवले. बॅंकेने त्याला फेब्रुवारी 2020 मध्ये आठ लाखांचे कर्ज मंजूर केले. या कर्ज रकमेतून दत्तात्रयने आईस्क्रीम उत्पादनासाठी लागणाऱ्या कसाटा आईस्क्रीम मशिन वाटी व कोनसाठीचे डाय आदी मशिनरींची खरेदी केली. बार्शी, दौंड पुणे आदी परिसरातून कच्चा माल आणला. त्याने आईस्क्रीम फॅक्‍टरीमधून मावा कुल्फी, वाटी कोन, चोकोबार आदी आईस्क्रीमची विविध उत्पादने घ्यायला सुरवात केली. या व्यवसायात त्याच्या भावाचेही सहकार्य मिळत होते. 

तयार आईस्क्रीम चारचाकी गाडीतून चौकांमध्ये, महामार्गावर यासह लग्नकार्य, बर्थडे पार्टी आदी कार्यक्रमांमध्ये विक्री करत होता. यातून चांगले उत्पन्नही मिळायला सुरवात झाली. मात्र उन्हाळ्याच्या ऐन सीझनमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन झाल्याने त्याचा अडीच ते तीन लाखांचा व्यवसाय बुडाला. बॅंकेचे हप्ते भरण्यास सवलत मिळाल्याने आधार मिळाला, मात्र आता बॅंकेचे हप्ते सुरू झाल्यावर ते भरायचे कसे, असा प्रश्‍न त्याच्यासमोर पडला; कारण आता आईस्क्रीमचा हंगाम संपला. आता पुढील उन्हाळ्याचीच त्याला वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तो पुन्हा आपल्या हमाली पेशाकडे वळाला. 

याबाबत दत्तात्रयने "सकाळ'शी बोलताना सांगितले, की आठ लाखांचे कर्ज घेऊन आईस्क्रीमचे उत्पादन सुरू केले. मात्र लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले. लॉकडाउन उठण्याची वाट पाहात आहे. कर्जाचा हप्ता दरमहा 17 हजार रुपये आहे. हप्ते भरण्यासाठी व्यवसायासोबत हमालीसुद्धा करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com