तरुण काय करू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोरोची ! सत्ताधाऱ्यांचा सर्वच्या सर्व 13 जागांवर पराभव 

Natepute
Natepute

नातेपुते (सोलापूर) : तरुणांनी मनात आणले तर बदल होऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे माळशिरस तालुक्‍यातील मोरोची ग्रामपंचायत. मागील सलग दहा- पंधरा वर्षे या ग्रामपंचायतीवर शिवाजीराव सूळ, भीमराव साळुंखे, हनुमंतराव सूळ त्यांचे बंधू जालिंदर सूळ, धनंजय वावरे आदींच्या घराण्यात आलटून-पालटून सत्ता होती. परंतु, मागील पाच वर्षांत माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती व शिवाजीराव सूळ यांचे चिरंजीव किशोर सूळ यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या जुन्या सवंगड्यांनी कोणाचाही पाठिंबा न घेता सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील लोकांना बाजूला ठेवत स्वतःचीच मोट बांधली आणि चमत्कार घडविला. 

सतत संघर्ष, ग्रामपंचायतीच्या कारभाराविरुद्ध निवेदने या तरुणांनी दिली आणि आवाज उठविला होता. राजकीय क्षेत्रात नवीन होते म्हणून या तरुणांची कुठेही दखल घेतली जात नव्हती. परंतु त्यांच्या कामाची तळमळ, ज्याच्यासाठी लढा देत आहेत ते गावातील जनतेला भावला, त्यामुळे सत्ताधारी गटाला सर्वच्या सर्व 13 जागी 
पराभवास सामोरे जावे लागले. 

या विजयाचे श्रेय सत्ताधारी लोकांच्या अनागोंदी कारभाराला जाते, असे विजयाचे शिल्पकार शुभम सूळ यांनी "सकाळ'ला सांगितले. विशेष म्हणजे नेतृत्व करण्यासाठी आमचे कोणाचेही नाव पेपरला देऊ नका, आम्ही सर्वजण नेते आहोत, आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत, अशी भावना या तरुणांनी व्यक्त केली. मतदारांनी हा विजय घडवून आणला. पाहिजे त्या लोकांना सत्तेत बसविले आहे. आमच्यापैकी एकाचे जरी नाव नेता म्हणून टाकले किंवा पेपरला फोटो टाकला तरी त्यात अहंकार निर्माण झाल्याची भावना होईल. आमचे सामूहिक नेतृत्व राहू द्या, अशी या तरुणांनी कळकळीची विनंती केली. 

तरुणांनी मनात आणले तर काय होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोरोचीमधील सत्तांतर ! 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com