
तू माझा मोबाईल चोरला आहेस म्हणून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रोहित पंडित हत्तुरे (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. दोन) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
सोलापूर : तू माझा मोबाईल चोरला आहेस, म्हणून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी प्रदीप गायकवाड व प्रवीण या दोघांविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रोहित पंडित हत्तुरे (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. दोन) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या मारहाणीत चेहऱ्यावर व डोक्याला जखम झाली आहे, असेही हत्तुरे यांनी पोलिसांना सांगितले.
वाहनचालकांना 15 लाखांचा दंड
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यादृष्टीने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दुचाकीस्वारांना विनाकारण घराबाहेर पडू नका, मास्क व सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन केले. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यांवरून विनामास्क वाहन चालविणाऱ्यांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. 17 ऑगस्टपासून शहर पोलिसांनी सुमारे 14 हजार 600 वाहनचालकांकडून 15 लाखांचा दंड वसूल केला आहे.
शैलेश घोंगडे खूनप्रकरणी संशयितांना जामीन
मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शैलेश घोंगडे याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी संजय राठोड व राहुल राठोड या दोघांना जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. पैशाच्या देवाण - घेवाणीतून शैलेश घोंगडे याचा दोन्ही संशयित आरोपींनी कुंभारी परिसरात गळा दाबून खून केल्यावरून वळसंग पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सोलापूर सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर संशयित आरोपींनी ऍड. जयदीप माने यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली. या प्रकरणात ऍड. विकास मोटे यांनीही काम पाहिले. सरकारतर्फे ऍड. वाय. एम. नखवा, ऍड. एच. जे. देढिया यांनी काम पाहिले.
आशा नगरात तरुणाने घेतला गळफास
आशा नगर (एमआयडीसी) येथील विष्णू नागनाथ शिंदे (वय 45) यांनी त्यांच्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. एमआयडीसी पोलिस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल