कोरोनाचा प्रादुर्भाव असेपर्यंत मंदिरे बंदच ठेवावीत : युगंधर संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

रमेश दास 
Monday, 26 October 2020

युगंधर संघटनेचे विशाल गुंड-पाटील यांनी सांगितले, की महाराष्ट्रामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे अनेक लोकांचे बळी जात असताना, मंदिराबाबतची तुमची भूमिका ही योग्य आहे. परंतु संकटातही राजकारण करू पाहणारे लोक "दार उघड दार उघड' म्हणून आंदोलन करून मंदिर उघडण्याची मागणी करीत आहेत. मंदिराची दारे उघडून खरं तर लोकांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखी ही गोष्ट आहे. 

वाळूज (सोलापूर) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात असेपर्यंत सर्व मंदिरे बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी युगंधर संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

याबाबत युगंधर संघटनेचे विशाल गुंड-पाटील यांनी सांगितले, की महाराष्ट्रामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे अनेक लोकांचे बळी जात असताना, मंदिराबाबतची तुमची भूमिका ही योग्य आहे. परंतु संकटातही राजकारण करू पाहणारे लोक "दार उघड दार उघड' म्हणून आंदोलन करून मंदिर उघडण्याची मागणी करीत आहेत. मंदिराची दारे उघडून खरं तर लोकांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखी ही गोष्ट आहे. मंदिरे सर्वांत शेवटी उघडायला हवीत; कारण मंदिरांमध्ये खूप मोठी गर्दी होते. तुम्ही कितीही नियम लावले तरी कोरोनासारखा आजार लोकांना विळखा घालणार; कारण तेथे जाणारे बहुतांश लोक हे वयोवृद्ध असतात आणि ही लोकं आपल्या कुटुंबाची खरोखरच संपत्ती आहे आणि ती जपली पाहिजे, ही भावना तुमच्यासह सर्वांचीच आहे. त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेत आहात ही आनंदाची बाब आहे. 

कंपन्यांची कामे वर्क फ्रॉम होम चालू आहेत, शिक्षण ऑनलाइन चालू आहे, मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सवर चालू आहेत मग मंदिरच का उघडायचेत? महाराष्ट्रात असे एकही घर नसेल त्यांच्या घरामध्ये देवीदेवतांचे फोटो किंवा देवघर नाही. तुम्ही घरांमध्येच देवाची पूजा करू शकता; मग मंदिरातच जाऊन घंटा वाजवायचा आग्रह का? आणि परत प्रश्न उरतो ते मंदिराबाहेर व्यवसाय करणाऱ्या लोकांनी काय करायचं? या लॉकडाउनमध्ये इंजिनिअर, अनेक छोटे-मोठे नोकरदार, कामगार, व्यवस्थित स्थिर असलेल्या छोट्या- मोठ्या अनेक व्यावसायिकांनी प्रपंचासाठी रस्त्यावर फळे आणि भाज्या विकल्या; मग तुम्ही काही दिवस कुंकू, अगरबत्त्या, पूजेचे साहित्य विकण्याऐवजी इतरांसारखं दुसरा काहीतरी छोटा-मोठा उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करू शकता. 

असं नाही की मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी मंदिरांवर बंदी आणलेली आहे. जिथं आवश्‍यक आहे तिथं लॉकडाउनमध्ये नाइलाजाने का होईना सूट दिली गेलेली आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाला त्रास झालेला आहे. आणखी थोडा वेळ जाऊ द्यावा हे निश्‍चित. संकट टळल्यानंतर पुन्हा मंदिरे सुरू होणार आहेत. मंदिरे ही सर्वांत शेवटीच उघडायला हवीत आणि या भूमिकेशी खरोखरच संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Yugandhar sanghatna demanded that the temples be kept closed as long as there was a corona