जातीय सलोखा राखणारे नेतृत्व : युन्नूसभाई शेख 

Yunnusbhai Shaikh
Yunnusbhai Shaikh

स्मरण : सोलापुरात 1967 मध्ये सोलापुरात मोठी जातीय दंगल झाली. युन्नूसभाई राहात असलेला पंजाब तालीम परिसर या दंगलीचा हॉटस्पॉट बनला. दंगलीशी कोणताही संबंध नसताना राजकीय सूडातून युन्नूसभाई आणि त्यांचे वडील हाजी जैनोद्दीन शेख यांना आरोपी करण्यात आले. परंतु न्यायव्यवस्थेने त्यांना निर्दोष केले. त्याची जबर किंमत युन्नूसभाईंना राजकीय व सामाजिकदृष्ट्या मोजावी लागली. 

1969 मध्ये पहिली सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली. या सार्वत्रिक निवडणुकीत युन्नूसभाई नगरसेवक म्हणून निवडून आले. 1969 ते 1992 युन्नूसभाई नगरसेवक म्हणून कार्यरत होते. सोलापुरात पुन्हा जातीय व सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवात विसर्जनादिवशी मानाच्या आजोबा गणपतीचे स्वागत मुस्लिम बांधवांनी पंजाब तालीमसमोर करण्याची प्रथा युन्नूसभाईंनी 1970 पासून केली. जातीय सलोखा राहावा हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. ती परंपरा आजही कायम आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा पुतळा आसार मैदान येथे उभा करावा, असे सर्व सावरकरप्रेमी व नागरिकांचा आग्रह होता. यासाठी हिंदू महासभेचे माजी आमदार वि. रा. पाटील, सावरकरवादी तेव्हाचे नगरसेवक विश्‍वनाथ बेंद्रे यांनी पुढाकार घेतला. त्याच आसार मैदानावर मोहरम, पैगंबर जयंती, रमजान, बकरी ईद या सणांच्या वेळी नमाजपठण हे मुस्लिम समाजाचे धार्मिक उत्सव होत असतात. तिथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारला तर समाजकंटकांना चांगलीच संधी मिळेल. मग जातीय सलोखा राहावा आणि सावरकरांचे माहात्म्य पण राहावे म्हणून हा पुतळा शहरात योग्य ठिकाणी उभा करण्याचे महत्त्व युन्नूसभाईंनी वि. रा. पाटील आणि विश्वनाथ बेंद्रे यांच्यासह समस्त सावरकरप्रेमींना पटवून दिले. तसा शब्दसुद्धा युन्नूसभाईंनी दिला. तेव्हा महानगरपालिकेत पुलोदची सत्ता होती. दोन वर्षांनी पुलोद समाजवादी कॉंग्रेसमध्ये विलीन झाला आणि मूळ कॉंग्रेसजनांनी सावरकरांच्या पुतळ्यास विरोध करण्यास सुरवात केली. युन्नूसभाई दिलेल्या शब्दाला ठाम राहिले. अशोक चौक येथील उद्यानात सावरकरांचा पुतळा उभा करण्याचा ठराव स्वकीय पक्षाच्या विरोधालासुद्धा मोठ्या कौशल्याने पटवून देत एकमताने मंजूर करून घेतला. त्या ठिकाणी पुतळा उभा केला. 

लक्ष्मी टॉकीज येथे लोककला, मेळे असे कार्यक्रम होत असत. हा वडिलोपार्जित त्यांचा व्यवसाय; नंतर मराठी, हिंदी व चित्रपट दाखवले जायचे. पण लक्ष्मी या नावाबद्दल त्यांना जिव्हाळा होता. तिचे पावित्र्य राखले जावे यावर युन्नूसभाईंचा कटाक्ष असे. लक्ष्मीची विधिवत पूजा व्हावी, तिच्या नावाला गालबोट लागणार नाही याची काळजी युन्नूसभाई घेत असत. आमदार निधीतून होटगी रोडवरील ईदगाह मैदानाचे काम करताना लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी अगोदर केला. 

1971-1972 मध्ये स्थायी समितीचे सभापती, 1974-1975 मध्ये महापौर म्हणून युन्नूसभाईंनी कारकीर्द गाजवली. 1972 ते 1980 कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तर 1980ते 1988 समाजवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून युन्नूसभाईंनी काम पाहिले. अनेक वर्षे पक्षनेते म्हणून मोलाचे योगदान युन्नूसभाईंचे आहे. पक्षाचे अध्यक्ष, स्थायी समिती सभापती, महापौर व पक्षनेते म्हणून भूमिका बजावताना सर्व समाजाच्या नेत्यांना, विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यायचा, हा युन्नूसभाईंचा स्वभाव गुणधर्म होता. किमान 29 महापौर, उपमहापौर यासह त्यांनी अनेक पदांवर अनेकांना संधी दिली. उदाहरणार्थ पुरणचंद्र पुंजाल, किशोर देशपांडे, महादेव महिंद्रकर, सुभाष पाटणकर, मुरलीधर पात्रे, मनोहर सपाटे, यू. एन. बेरिया, खाजादाऊद नालबंद यांसह अनेक महापौर त्यांनी केले. मुस्लिम समाजाचे दोनच तसेच नारायणराव कोनापुरे, संगप्पा केंगनाळकर, गोविंद एकबोटे, जयप्रकाश मालटुणकर, बसवराज टिमके, कै. मुकेश अब्दुलपूरकर यांसह अनेक नावे सांगता येतील. पण कटाक्षाने पाहिले तर सर्व जाती-जमातीच्या कार्यकर्त्यांना युन्नूसभाईंनी न्याय दिल्याचे दिसते. हा सामाजिक सलोखा आहे. 

युन्नूसभाईंनी अनेक संस्थांच्या उभारणीत मदत केली. सिटिझन हायस्कूलचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. पानगल हायस्कूल, सोशल कॉलेज, सोशल बॅंक या समाजाच्या संस्था उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पण विश्‍वस्त म्हणून या संस्थांवर जाण्याचे त्यांनी टाळले. याचबरोबर अश्विनी सहकारी रुग्णालय, शिवस्मारक, पद्मशाली संस्था, पूर्वभाग वाचनालय, मर्कन्टाईल बॅंक या संस्था उभारणीत युन्नूसभाईंचा मोलाचा वाटा आहे. गरीब व्यापाऱ्यांसाठी मिनी गाळे ही संकल्पना युन्नूसभाईंचीच. त्यांच्या प्रत्येक कृतीतून जातीय सलोखा दिसून येतो. यशवंतराव चव्हाण यांचे विचार त्यांनी आयुष्यभर जपले. चव्हाण यांचा पुतळा उभा केल्याचे समाधान त्यांना होते. शरद पवार यांचे निष्ठावान असलेल्या युन्नूसभाईंनी शेवटपर्यंत निष्ठा वाहिली. 

युन्नूसभाईंचा जन्म दिवस 12 डिसेंबरचा पण याच दिवशी शरद पवार यांचा जन्म दिवस असल्याने त्यांनी आपला वाढदिवस कधीच साजरा केला नाही. असे युन्नूसभाई 14 जून 2020 रोजी जग सोडून गेले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com