सांगोला-महूद मार्गावरील खड्डे बुजवा, अन्यथा... "या' सेनेने दिला इशारा

उमेश महाजन 
Friday, 11 September 2020

तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जत ते पंढरपूर या मार्गाने होणारी जड वाहनांची वाहतूक सांगोला-अकलूज मार्गे वळवली होती. पूर्वी राज्यमार्ग असलेला हा रस्ता अरुंद व फारसा पक्का बांधकामाचा नव्हता. या मार्गाने जड वाहतूक वळविल्याने सांगोला-अकलूज या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे वाढलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन जड वाहनांची वाहतूक याच मार्गे करण्याची सक्ती मागे घेण्यात आली. असे असले तरी अनेक जड वाहने पूर्वीप्रमाणे याच मार्गाने जात आहेत. 

महूद (सोलापूर) : नव्याने घोषित करण्यात आलेल्या इंदापूर ते जत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी या मार्गावर सांगोला ते महूद व पुढे माळशिरस तालुक्‍यातील साळमुखपर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सांगोला तालुका युवा सेनेचे समन्वयक शंकर मेटकरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

इंदापूर, अकलूज, महूद, सांगोला ते जत असा नव्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. इंदापूर ते जत या राष्ट्रीय महामार्गास 965 जी असा क्रमांक ही पडलेला आहे. या घोषणेस अनेक वर्षे होऊन गेली तरी इंदापूर ते सांगोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्रत्यक्षात सुरवात झालेली नाही. नव्याने मंजूर या राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारील जमिनींची, झाडांची गणना अनेक वेळा झाली आहे. शिवाय अनेक वेळा या भागाचे सर्वेक्षणही करण्यात आलेले आहे. तरीही संबंधित विभागाला निधीअभावी या कामाचा मुहूर्त सापडलेला नाही. 

दरम्यान, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहिला नसल्याने बांधकाम विभाग यावर कोणतेही काम करत नाही. त्यातच तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जत ते पंढरपूर या मार्गाने होणारी जड वाहनांची वाहतूक सांगोला-अकलूज मार्गे वळवली होती. पूर्वी राज्यमार्ग असलेला हा रस्ता अरुंद व फारसा पक्का बांधकामाचा नव्हता. या मार्गाने जड वाहतूक वळविल्याने सांगोला-अकलूज या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे वाढलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन जड वाहनांची वाहतूक याच मार्गे करण्याची सक्ती मागे घेण्यात आली. असे असले तरी अनेक जड वाहने पूर्वीप्रमाणे याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी उचकटला आहे. महूद ते सांगोला रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयसीयू, ढाळेवाडी चौकी, वाकी, शिवणे तसेच महूद ते साळमुख दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्याचा अंदाज न आल्याने या परिसरात अनेक अपघात घडले आहेत. हे खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत, या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने तालुका समन्वयक शंकर मेटकरी यांनी नायब तहसीलदार किशोर बडवे यांना दिले आहे. या वेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख नवल गाडे, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, शिवसेना उपप्रमुख आदित्य काशीद, संतोष वसमळे, संतोष खडतरे, सागर चव्हाण, ऋषिकेश गरांडे आदी उपस्थित होते. 

राष्ट्रीय महामार्ग, सोलापूरचे उपअभियंता भास्कर क्षीरसागर म्हणाले, वेळापूर ते सांगोला या 46 किलोमीटरपैकी 24 किलोमीटर लांबीच्या नूतनीकरण कामास मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी काही काम झाले आहे. या मार्गावरील उरलेले काम व खड्डे बुजवण्याचे काम पावसात करणे शक्‍य नसल्याने पाऊस थांबल्यानंतर करण्यात येईल. शिवाय या मार्गावरील उर्वरित नूतनीकरण कामाची मागणी करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuva Sena demands filling of potholes on Sangola to Mahud road