युवासेना होतेय मजबूत ! शहरात प्रभागनिहाय शाखाप्रमुख; "युवती सेने'तून तरुणींनाही संधी 

तात्या लांडगे 
Friday, 4 December 2020

पुढील वर्षात सोलापूर महापालिकेसह मुंबई व राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला महापालिकेवरील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आतापासूनच राज्य विस्तारक तथा सोलापूरचे संपर्कप्रमुख विपुल इंगळे, सूरज साळुंखे, उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची जम्बो कार्यकारिणी निवडली जाणार आहे. 

सोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर केले. मात्र, वर्षानुवर्षांचे मित्र असलेल्या भाजप- शिवसेनेत सत्तेच्या वाटाघाटीवरून वाद निर्माण झाला आणि राजकीय शत्रूंशी मैत्री झाली. हा अनुभव पाठीशी ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्षांनी आपापली संघटनात्मक ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे संपर्कप्रमुख तथा युवासेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आता सोलापुरात प्रभागनिहाय शाखाप्रमुख नेमले जाणार आहेत. 

पुढील वर्षात सोलापूर महापालिकेसह मुंबई व राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला महापालिकेवरील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आतापासूनच राज्य विस्तारक तथा सोलापूरचे संपर्कप्रमुख विपुल इंगळे, सूरज साळुंखे, उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची जम्बो कार्यकारिणी निवडली जाणार आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात युवासेनेची कोअर कमिटी सोलापूर दौऱ्यावर येत असून उद्या (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता पार्क चौकातील युवा सेनेच्या कार्यालयात नव्या कार्यकारिणी निवडीबद्दल चर्चा होणार आहे. 

महापालिका निवडणुकीत आता शिवसेना जुन्या- नव्यांचा मेळ बसवून नव्या युवा चेहऱ्यांनाही संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात युवासेनेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नियोजन सुरू केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, युवती सेनेच्या माध्यमातून आता महाविद्यालयीन तरुणींसह अन्य क्षेत्रातील तरुणींचीही ताकद शिवसेनेच्या पाठिशी उभी केली जात आहे. 

युवासेनेला सामाजिक बांधिलकीची जाण 
कोरोना काळात दरवर्षीप्रमाणे होणारे रक्‍तदान शिबिरे होऊ शकलेली नाहीत. राज्यात आगामी काळात रक्‍ताचा तुटवडा भासू नये, गरजूंना रक्‍त मिळावे या हेतूने राज्यभर रक्‍तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 9 डिसेंबरला सोलापुरातील नीलम नगरात रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती विठ्ठल वानकर यांनी दिली. 

युवा सेनेसंबंधित ठळक बाबी... 

  • राज्य विस्तारक तथा संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल वानकरांनी निवडली जम्बो कार्यकारिणी 
  • महापालिका निवडणुकीपूर्वी निवडणार युवासेनेचे प्रभागनिहाय शाखाप्रमुख 
  • शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी तीन उपशहरप्रमुख 
  • जिल्ह्यात जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जात आहेत आढावा बैठका 
  • शहरासाठी युवती शहरप्रमुख तर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हाप्रमुख, तालुक्‍यांनाही तालुकाप्रमुख मिळणार 
  • युवकांच्या माध्यमातून युवासेना मजबूत करण्याचे नियोजन; महापालिका, नगरपालिका निवडणुकीवर डोळा 
  • पुढील आठवड्यात राज्य विस्तारक पिंगळे यांच्या उपस्थितीत होणार लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvasena will select ward wise branch heads in the city