'झेडपी'चा निर्णय ! सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

तात्या लांडगे
Wednesday, 2 December 2020

'माझे गाव कोरोनामुक्‍त गाव'चे ठोस नियोजन
कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यादृष्टीने नियोजन सुरु आहे. गावोगावी 'माझे गाव कोरोनामुक्‍त गाव' हे अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये दुसऱ्या लाटेत दहा टक्‍क्‍यांची वाढ होईल, असे सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोना संशयितांची टेस्टही वाढविली जात आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या संशयितांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी संबंधित तालुक्‍यातील नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोय करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 

'माझे गाव कोरोनामुक्‍त गाव'चे ठोस नियोजन
कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यादृष्टीने नियोजन सुरु आहे. गावोगावी 'माझे गाव कोरोनामुक्‍त गाव' हे अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये दुसऱ्या लाटेत दहा टक्‍क्‍यांची वाढ होईल, असे सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोना संशयितांची टेस्टही वाढविली जात आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

 

कर्नाटकसह अन्य राज्यातून सोलापुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी रेल्वे स्थानक, एसटी स्थानकांवर केली जाणार आहे. तर जिल्ह्याच्या सीमेजवळील नागरी आरोग्य केंद्रांवरही संशयितांची तपासणी केली जाईल, असेही स्वामी यांनी सांगितले. त्यानुसार महापालिकेने नियोजन केले असून ग्रामीण भागात परजिल्ह्यातून तथा परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर वॉच ठेवण्यासाठी चार पथकांची नियुक्‍ती केली आहे. तर त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक केल्याचे त्यांनी सांगितले. टेंभूर्णी, करमाळा, माळशिरस (नातेपुते), सांगोला, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर अशा ठिकाणीही तपासणीची सोय केली आहे. परजिल्ह्यातून तथा परराज्यातून कोरोना बाधित रुग्ण आपल्याकडे येऊ नयेत, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत, पुढील संसर्ग थांबावा या हेतूने हे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासह स्थानिक पोलिसांचाही मदत घेतली जाणार आहे.

 

नगरपालिका क्षेत्रातच वाढतोय कोरोना
पंढरपूर, बार्शी, माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा या पाच तालुक्‍यांमध्ये कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या आतापर्यंत सर्वाधिक राहिली आहे. परजिल्ह्यातून तथा कामानिमित्त परराज्यातून येणाऱ्यांची संख्या शहरांमध्ये लक्षणीय आहे. नगरपालिका तथा नगरपरिषद क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर आता नगरपालिकांनाही स्वतंत्र आराखडा तयार करावा लागेल. परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्यांच्या नोंदी नियमित ठेवून त्यांचीही कोरोना टेस्ट केली जाईल. संशयितांना क्‍वारंटाईन तर बाधितांवर वेळेत उपचार करणे सोयीचे होईल. त्यामुळे ठराविक ठिकाणी वाढणारा संसर्ग आटोक्‍यात येईल, असा विश्‍वास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP's decision! Corona test of the suspects coming to Solapur on the district boundary