
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.
प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये
या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''
तिकीट दर कमी करा
अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.
खासगीकरणाचा डाव
शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.
तातडीने निर्णय बदलावा
विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.
हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ
सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.