esakal | कोल्हापूरचा हर्षद ‘नासा’च्या ‘ब्रेल’ टीममध्‍ये
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरचा हर्षद ‘नासा’च्या ‘ब्रेल’ टीममध्‍ये

कोल्हापूर - शालेय वयापासूनच निसर्गमित्र, सर्पमित्र म्हणून पर्यावरण जतन व संवर्धनाचे काम करणारा हर्षद कुलकर्णी... नुकतीच त्याने अमेरिकेतील मॅनहॅटन (कॅन्सास) येथील कॅन्सास स्टेट युनिव्हर्सिटीमधून ‘पीएचडी’ मिळवली असून त्याच युनिव्हर्सिटीतर्फे आता तो ‘नासा’च्या महत्त्वाकांक्षी मंगळावरील संभाव्य जीवसृष्टी शोध मोहिमेचा घटक बनला आहे.

कोल्हापूरचा हर्षद ‘नासा’च्या ‘ब्रेल’ टीममध्‍ये

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - शालेय वयापासूनच निसर्गमित्र, सर्पमित्र म्हणून पर्यावरण जतन व संवर्धनाचे काम करणारा हर्षद कुलकर्णी... नुकतीच त्याने अमेरिकेतील मॅनहॅटन (कॅन्सास) येथील कॅन्सास स्टेट युनिव्हर्सिटीमधून ‘पीएचडी’ मिळवली असून त्याच युनिव्हर्सिटीतर्फे आता तो ‘नासा’च्या महत्त्वाकांक्षी मंगळावरील संभाव्य जीवसृष्टी शोध मोहिमेचा घटक बनला आहे.

‘नासा’च्या ‘बायोलॉजिक अँड रिसोर्स ॲनॅलॉग इन्व्हेस्टिगेशन्स इन लो लाईट एन्व्हॉर्मेंटस्‌-‘ब्रेल’ टीममध्ये त्याचा समावेश असून अमेरिकेतील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या लाव्हा गुहांमध्ये या टीमचे संशोधन सुरू झाले आहे.   

हर्षद येथील तवन्नापा पाटणे हायस्कूलचा माजी विद्यार्थी. केआयटी कॉलेजमध्ये ‘एन्व्हायर्न्मेंट निंजिनिअरिंग’ पूर्ण केल्यानंतर तो अमेरिकेला गेला. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ‘एमएस’ पूर्ण केल्यानंतर त्याने कॅन्सास स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ‘पीएचडी’ केली असून ‘पीएचडी’ नंतरच्या संशोधनासाठी तो ‘नासा’च्या ‘ब्रेल’ टीममध्ये सहभागी झाला आहे. मंगळावरील संभाव्य जीवसृष्टी शोध मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

‘नासा’ने त्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून ‘ब्रेल’ टीमचे संशोधन सुरू झाले आहे. मंगळावर ज्वालामुखी थंड झाल्यानंतर काही गुहा तयार झाल्या. मात्र तेथे आता पूर्ण अंधार आहे. या गुहांमध्ये काही सजीवांचे अस्तित्व असू शकेल का, या प्रश्‍नातून या संशोधनाला प्रारंभ झाला आहे. रोव्हरच्या सहाय्याने विविध गुहांमध्ये सध्या हे संशोधन सुरू असून मंगळावरील गुहा आणि या पृथ्वीवरील गुहा यांच्यातील तौलनिक अभ्यास केला जाणार आहे.

हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मंगळावर पाठवल्या जाणाऱ्या मार्स रोव्हरमधून नेमक्‍या काय नोंदी घेता येतील, हे ठरवले जाणार आहे. दरम्यान, हर्षद येथील पालकमंच संवेदना संस्थेच्या जुई कुलकर्णी यांचा मुलगा असून विद्यार्थी व पालकांतील संवाद अधिक प्रभावी व्हावा, या उद्देशाने संस्थेचे काम चालते. या कामांतही पूर्वी हर्षद सहभागी होत होता.

पृथ्वीव्यतिरिक्त ग्रहांवर सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेणे ‘नासा’चे एक उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमची टीम संशोधन करत आहे. 
- हर्षद कुलकर्णी

loading image