Wari 2019 : यंदा आषाढीला जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 July 2019

आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या आधी होणाऱ्या दोन स्वतंत्र नित्यपूजांमुळे लाखो भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन यंदा या नित्यपूजा दोन दांपत्यांच्या हस्ते एकाच वेळी केल्या जाणार आहेत.

पंढरपूर - आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या आधी होणाऱ्या दोन स्वतंत्र नित्यपूजांमुळे लाखो भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन यंदा या नित्यपूजा दोन दांपत्यांच्या हस्ते एकाच वेळी केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे पंचेचाळीस मिनिटे वेळेची बचत होणार आहे. या वेळेत नेहमीपेक्षा सुमारे अडीच ते तीन हजार जादा भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या आधी यंदा श्री विठ्ठलाची नित्य आणि पाद्यपूजा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सपत्नीक, तर त्याच वेळी श्री रुक्‍मिणीमातेची पूजा नगराध्यक्षा साधना भोसले आणि त्यांचे पती नागेश भोसले यांच्या हस्ते केली जाणार आहे. त्यामुळे दर्शनरांग रात्री बारा वाजता बंद न करता ती पाऊणपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या वाढीव पंचेचाळीस मिनिटांत सुमारे अडीच ते तीन हजार जादा भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे. 

पहाटे सव्वादोनला महापूजा 
आषाढी एकादशी दिवशी पहाटे सव्वादोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरवात होईल. श्री विठ्ठल आणि श्री रुक्‍मिणीमातेची पूजा केल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मंदिरातील सभामंडपात वारकरी प्रतिनिधी आणि निर्मल वारी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. 

मुख्यमंत्री पाचशे मीटर चालणार 
आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा मंदिरापर्यंत येतो. यात्रेतील गर्दीमुळे वाहनांच्या ताफ्याचा वारकऱ्यांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन शिवाजी महाराज चौकापासून श्री विठ्ठल मंदिरापर्यंत मुख्यमंत्र्यांनी पायी यावे, अशी विनंती आमदार प्रशांत परिचारक यांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराज चौकापासून मंदिरात चालत येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benefits darshan to the maximum devotees