esakal | #SaathChal ‘संवाद वारी’ आज लोणंदमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Sanwad-Wari

#SaathChal ‘संवाद वारी’ आज लोणंदमध्ये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे महसूल यंत्रणा, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक यांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे. या वारीचा प्रारंभ पुण्यातून झाला असून, पालखी मार्गावर विशेष चित्ररथदेखील सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. 

‘ज्ञानेश्वर माउली..., ज्ञानराज माउली, तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरवात झाली आहे. दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. या भक्त मेळ्यात यंदा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘संवाद वारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. लोणंद येथे शुक्रवारी (ता. १३) व फलटण येथे १४, १५, १६ जुलै रोजी ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शासनाच्या अनेकविध योजना, उपक्रम विविध घटकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

शासनाच्या शेती आणि ग्राम विकासाशी निगडित विविध योजना, उपक्रमांची माहिती या संवाद वारीतून दिली जाणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, बाजार समित्यांमध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश असेल. पंढरपूर येथे होणाऱ्या पाच दिवसांच्या प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘संवाद वारी’चे दालन असणार आहे.