दिघंचीत हातातोंडाला आलेला 100 हेक्‍टर ऊस भुईसपाट 

गणेश जाधव
Wednesday, 9 September 2020

वादळी पावसाने दिघंची राजेवाडी परिसरात हातातोंडाला आलेल्या 100 हेक्‍टर ऊस भुईसपाट झाला आहे. तर डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तातडीने प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

दिघंची : वादळी पावसाने दिघंची राजेवाडी परिसरात हातातोंडाला आलेल्या 100 हेकटर ऊस भुईसपाट झाला आहे. तर डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तातडीने प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

कायम दुष्काळी असणाऱ्या दिघांची परिसरामध्ये पावसामुळे व निंबाळकर तलावामध्ये टेंभूचे पाणी आल्याने परिसरामध्ये उसाची लागवड मोठा प्रमाणात झाली आहे. ऊसाचे पीक ही जोमात आले होते. 
लवकरच साखर कारखाने सुरू होणार आहेत. ऊस कारखान्याला जाणार या शेतकऱ्याच्या आनंदी क्षणावर मुसळधार पावसाने विरजण पडले. 

तरती मळा, मोरे मळा, कुंभार मळा, घनचरे मळा पूजारवाडी, पंढरेवाडी,राजेवाडी आदी ठिकाणी संपूर्ण क्षेत्र भुईसपाट झाले आहे. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. वातावरण ढगाळ असल्याने त्याचा परिणाम डाळिंब भागावर झाला आहे. डाळिंब बागावर तेल्या रोगाने हल्ला केला आहे. तर उरल्या बागांचे वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. 

दिघंची परिसरामध्ये वादळी पावसाने ऊस व डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तलाठी यांनी तातडीने पंचनामे करावेत 
- सागर ढोले, ग्रा. पं. सदस्य 

आमचे हक्काचे पीक ऊस भुईसपाट झाले. तर डाळिंब मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई व पीक विमा द्यावा 
- सचिन मोरे, शेतकरी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 hectares of sugarcane land in Dighanchi