esakal | 13 दिवस, 17 राज्ये आणि 10 हजार किलोमीटरचा रस्ता...
sakal

बोलून बातमी शोधा

 13 days, 17 states and 10,000 kilometers of road ...

हार्ले डेव्हिडसन... बस नाम ही काफी है... ही बाईक खरेदी करणाऱ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या "हार्ले लेडी' ठरल्या सांगलीकर निशा कदम.

13 दिवस, 17 राज्ये आणि 10 हजार किलोमीटरचा रस्ता...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हार्ले डेव्हिडसन... बस नाम ही काफी है... ही बाईक खरेदी करणाऱ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या "हार्ले लेडी' ठरल्या सांगलीकर निशा कदम. त्यांनी केवळ गाडी घेतली नाही तर कंपनीचे चॅलेंज स्वीकारत तेरा दिवसांत तब्बल 10 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तब्बल सतरा राज्यांतून त्या फिरल्या. आता "के टू के' म्हणजे काश्‍मीर टू कन्याकुमारी राईड करण्याचा त्यांचा मानस आहे. 

हॉटेल व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या निशा कदम यांना हार्ले डेव्हिडसन खरेदी करण्याआधी दुचाकी फार वापरलेली नव्हती. अगदी क्वचित. तब्बल साडेसात लाख रुपयांची गाडी खरेदी केल्यानंतर ती शिकायची कसरत करावी लागली. कारण, अन्य दुचाकी 20, 30, 40 किलोमीटर प्रतीतास धावल्या तरी चालते. हिचा वेग मात्र किमान वेग 100 किलोमीटर प्रतीतास लागतो, अन्यथा गाडी इतकी गरम होते की तुम्ही त्यावर बसू शकत नाही. निशा कदम यांनी जोरदार सराव केला आणि मग हार्लेचे "21 बाय 365' चॅलेंज म्हणजे वर्षात देशातील हार्ले डेव्हिडसनच्या 21 शोरूमना भेट द्यायच आव्हान त्यांनी 13 दिवसांत पूर्ण केले. या टीममध्ये होते; कोल्हापूरचे आदित्य घाटगे, सर्वेश पाठक आणि निशा कदम. 

या टिमने सांगलीतून सुरवात केली. मुंबईमार्गे गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातून पुन्हा कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, तमिळनाडू आणि केरळ आणि गोव्याहून परत महाराष्ट्र असा हा तब्बल 10 हजार किलोमीटरचा प्रवास होता. देशातील सर्वात मोठ्या यमुना एक्‍स्प्रेस हायवे वरून सुसाट वेगाने बाईक चालवणे अफलातून होते, असे निशा कदम सांगतात. पंजाबमध्ये वाघा बॉर्डरला त्यांनी भेट दिली. शिवाय वाटेत काही प्रेक्षणीय स्थळंही पाहिली. 

त्या म्हणाल्या,""काहीतरी वेगळे, भन्नाट करण्याची कल्पना अनेक दिवस डोक्‍यात घोळत होती. अखेर तो मार्ग सापडला. या भ्रमंतीनंतर आता आम्ही काश्‍मीर टू कन्याकुमारी मोहिमेचा संकल्प केला आहे. मला ही दुचाकीसह पाहिले की अनेकांना आश्‍चर्य वाटते. या बाईकचा वेग भन्नाट आणि ती बाई चालवतेय याचं अप्रुप. ही क्रेझ असणारी मंडळी ठरावीक कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतच असतात. पुण्यानंतर आता सांगली-कोल्हापुरात असे गट तयार होत आहेत. हे विश्‍वच वेगळेच आहे.''