
सांगली जिल्ह्यातील 137 प्राथमिक शाळांची "मॉडेल स्कूल' उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्याची प्राथमिक यादी तयार आहे.
सांगली ः जिल्ह्यातील 137 प्राथमिक शाळांची "मॉडेल स्कूल' उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्याची प्राथमिक यादी तयार आहे. ग्रामपंचायत निवडणूक संपताच त्याची घोषणा केली जाईल. प्रत्येक केंद्रातून एक शाळा निवडली आहे. शासकीय योजना आणि लोकसहभागातून शैक्षणिक विकास चळवळ उभी करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केला आहे. त्यासाठी सर्व विभागांना त्यांच्या सहभागाविषयी सूचना दिल्या आहेत.
जितेंद्र डुडी यांनी पदभार स्विकारतानाच "मी आरोग्य आणि शिक्षण' या विषयावर फोकस करणार आहे, असे जाहीर केले होते. कोरोना संकट काळात त्यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर काम केले. आता शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच्या नियोजनासाठी आज प्रभारी शिक्षणाधिकारी राहूल गावडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे आदींशी चर्चा केली. त्यातून केंद्रनिहाय एकेक याप्रमाणे 137 शाळांची निवड करण्यात आली. या शाळा निवडताना तेथील पटसंख्या समाधानकारक असावी, यावर भर दिला आहे.
मॉडेल शाळा संकल्पनेत विविध योजनेतून इमारत विकास, इमारत दुरुस्ती, कुंपन भिंती बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, क्रीडांगण सपाटीकरण या भौतिक सुविधांचे नियोजन केले जाईल. शिक्षण विकासासाठी डिजीटल शाळा, ग्रंथालय, आवश्यतेनुसार प्रयोगशाळा केल्या जातील. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.
त्यासाठी लोकांशी संवाद साधला जाईल. वरिष्ठ अधिकारी शाळांना भेट देतील. शिक्षकांना या प्रक्रियेत पूर्ण क्षमतेने कामासाठी आग्रह केला जाईल. हा बदल शिक्षण बदलाची चळवळ म्हणून पुढे येईल, अशी अपेक्षा श्री. डुडी यांनी व्यक्त केली.
शिक्षण परिवर्तन चळवळ यातून उभी करूया
प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत आदर्श बदल करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात मला लोकसहभाग हवा आहे. आम्ही शासकीय योजनेतून ताकद देऊ, लोकांनी पुढे येऊन हात द्यावा. एक मोठी शिक्षण परिवर्तन चळवळ यातून उभी करूया.
- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी