खाऊच्या पैशातून सिमेवरील जवानांसाठी बनवल्या राख्या

हरिभाऊ दिघे        
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून पाचशेहून अधिक राख्या स्वत: बनवल्या असून या सर्व राख्या सिमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना पाठवण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

सिमेवरील अनेक भारतीय जवानांना राखी पौर्णिमेला आपल्या घरी येता येत नाही. त्यामुळे शिक्षक अजित कांबळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करुन घेऊन सैनिकांना त्या पाठवाव्या असा विचार त्यांच्या मनात आला आणि ही संकल्पना त्यांनी मुख्याध्यापक जी.ए. कागदे यांच्यापुढे मांडली. याला त्यांनी संमतीही दिली.

त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून राख्या बनवण्यासाठी रंगीत सुती धागे आणि अन्य कलात्मक साहित्य आणले आणि विविध प्रकारच्या डिझाईनच्या राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. शाळेने राख्यांसाठी येणारा खर्च देऊ केला असता मुला- मुलींनी तो घेण्यास नकार दिला. या विद्यार्थ्यांना शिक्षिका श्रीमती रोहीनी रासकर, प्रा.विजय खाडे, श्रीमती आभाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकर्षक अशा राख्यांचे ग्रामस्थांनीही कौतुक केले आहे.