कळंबा कारागृहातील १४ कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

कोल्हापूर - वाई हत्याकांडातील मुख्य संशयित संतोष पोळच्या कळंबा कारागृहातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी आज आणखी १४ कर्मचाऱ्यांना कारागृह विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना निलंबित केले.

कोल्हापूर - वाई हत्याकांडातील मुख्य संशयित संतोष पोळच्या कळंबा कारागृहातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी आज आणखी १४ कर्मचाऱ्यांना कारागृह विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना निलंबित केले.

कर्तव्यात निष्काळजी व हलगर्जी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या सर्वांची नावे उद्या (ता. ८) प्राप्त होतील. मात्र यात कारागृहातील हवालदार, सुभेदार, सुरक्षारक्षकांचा समावेश असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. 

कळंबा कारागृहात असताना संशयित डॉ. पोळचा २७ नोव्हेंबरला व्हिडिओ व्हायरल झाला. कारागृहातील बॅरॅकमध्ये हातात पिस्तूल घेऊन बिनधास्तपणे इकडून तिकडे फिरतो, खाली बसून पिस्तूल न्याहाळत असल्याचे चित्रीकरण होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने कारागृह विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक साठे कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यात संबंधित पिस्तूल हे बनावट असल्याचे सिद्ध झाले. मात्र, चित्रीकरणासाठी मोबाईलचा वापर करण्यात आला. तो मोबाईल कारागृहात कसा आला, याची चौकशी साठे यांनी केली. याबाबत सुरक्षारक्षक राकेश पवारला निलंबितही करण्यात आले.

डॉ. पोळच्या संपर्कात असणाऱ्या १५ हून अधिक कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. याबाबत कर्तव्यात निष्काळजी व हलगर्जी केल्याप्रकरणी १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात सुरक्षारक्षक, सुभेदार, हवालदार आदींचा समावेश आहे. साठे यांच्याकडून निलंबनाच्या आदेशाचे गोपनीय पत्र कारागृहाला पाठविण्यात आले आहे. ते उद्या प्राप्त झाल्यावर १४ निलंबित कर्मचाऱ्यांची नावे स्पष्ट होणार असल्याचे कारागृह अधीक्षक शेळके यांनी सांगितले.

Web Title: 14 employees in Kalamba jail suspended