दीड कोटींच्या बकऱ्याचे 16 लाखांचे पिल्लू चोरीला!

नागेश गायकवाड
Saturday, 26 December 2020

दीड कोटी किमतीचा बकरा राज्यभर गाजला. या बकऱ्याच्या पिल्लालाही सोळा लाखांना मागणी होती. हा सोळा लाखांच्या बकऱ्याची काल मध्यरात्री चोरी झाली.

आटपाडी (जि. सांगली) : आटपाडीत भरलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात सांगोला तालुक्‍यातून आलेल्या दीड कोटी किमतीचा बकरा राज्यभर गाजला. या बकऱ्याच्या पिल्लालाही सोळा लाखांना मागणी होती. हा सोळा लाखांच्या बकऱ्याची काल मध्यरात्री चोरी झाली. याची फिर्याद मालक सोमनाथ जाधव यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

याबाबत पोलिस आणि बकऱ्याचे मालक सोमनाथ जाधव यांनी अधिक माहिती दिली. कार्तिक महिन्यात दरवर्षी होणारी ग्रामदैवत उत्तरेश्वर यात्रा रद्द केली होती. मात्र तीन दिवस शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरवला होता. या बाजारात सांगोला तालुक्‍यातून आलेल्या मोदी बकरा सर्वांचे आकर्षण ठरला होता. या मोदी बकऱ्याला 75 लाखाची मागणी केली होती, तर मालकाने किंमत दीड कोटी रुपये सांगितली होती.

तसेच या बकऱ्याचे दोन महिन्यांचे पिल्लू आटपाडीचे सोमनाथ जाधव यांनी दोन लाख रुपयाला विकत घेतले होते. हे पिल्लू सहा महिन्याचे झाले होते. आटपाडी च्या बाजारात या पिल्लाची सोळा लाखींना मागणी केली होती. मात्र सोमनाथ जाधव यांनी तो विकला नव्हता. 

येथील आंबेबन मळ्यात सोमनाथ जाधव सहकुटुंब राहतात. घराशेजारीच त्यांचा मेंढ्याचा वाडा आहे. या वाड्यामध्ये हा बकरा ठेवला होता. काल शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे मेंढ्या हिंडवून आणून वाड्यामध्ये कोंडल्या होत्या. मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी हा बकरा चोरून नेला.

सकाळी हा प्रकार सोमनाथ जाधव यांच्या लक्षात आला. या घटनेची फिर्याद देण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण आणि शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. बकऱ्याची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षिसाची घोषणा जाधव केली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.5 crore goat's calf worth 16 lakh stolen!

Tags
टॉपिकस
Topic Tags: