इथल्या 15 गावांत कोरोना वेशीबाहेरच; नागरिकांची लढाई, प्रशासन, "आशां'ची कर्तबगारी

पोपट पाटील
Friday, 18 September 2020

गेले पाच महिने सुरू असलेल्या कोरोनाच्या लढाईत वाळवा तालुक्‍यातील दोन शहरांसह 98 गावांपैकी 15 गावांतील नागरिकांनी आजही कोरोनाला गावाच्या वेशीबाहेरच रोखले आहे.

इस्लामपूर (जि . सांगली ) : गेले पाच महिने सुरू असलेल्या कोरोनाच्या लढाईत वाळवा तालुक्‍यातील दोन शहरांसह 98 गावांपैकी 15 गावांतील नागरिकांनी आजही कोरोनाला गावाच्या वेशीबाहेरच रोखले आहे. शासकीय नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि काही विशेष उपाययोजना राबविल्यानेच या गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. 

वाळवा तालुक्‍यात कोरोनाच्या प्रसारामुळे गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहेत. या गंभीर परिस्थितीत तालुक्‍यातील 15 गावांनी आजही कोरोनाला गावाबाहेरच थोपवून एक आदर्श निर्माण केला आहे. यात नायकलवाडी, घबकवाडी, ठाणपुडे, शेखरवाडी, डोंगरवाडी, कार्वे, ढगेवाडी, बेरडमाची, गौंडवाडी, भरतवाडी, शिवपुरी, हुबालवाडी, खरातवाडी, लाडेगाव, जक्राईवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावातील लोकसंख्या कमी आहे, शिवाय येथील लोकवस्ती विरळ आहे, घरे लांब-लांब आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचा गावातील इतर नागरिकांशी संबंध कमी प्रमाणात येतो. प्रत्येक कुटुंब आपापल्या शेतात काम करून घरी परतते. मात्र, कोरोनाला टाळण्यासाठी गावातील पारावर बसून चर्चा करणे या गावांनी टाळले आहे. याशिवाय, शहराशीही कमीत कमी संपर्क ठेवला आहे. 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्या वेळी प्रशासनाने अत्यंत कडक असे लॉकडाउन जाहीर केले होते. त्यानुसार तालुक्‍यातील प्रत्येक गावातील महसूल प्रशासनाने त्याचा अवलंब केला होता. यात सोशल डिस्टन्स ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, प्रवास टाळणे, हात नेहमी साबणाने स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टींचे नागरिकांत वारंवार प्रबोधन केले जात होते. तरीही आज तालुक्‍यातील रुग्णांची संख्या वाढतच आहे. याला कारणीभूत काही प्रमाणात नागरिकच आहेत. विनाकारण शहरात फेरफटका मारणे, चौकात चारचौघे बसून गप्पा मारणे... यांमुळे आता कोरोनाचा आकडा मोठा झालेला आहे. या 15 गावांनी मात्र सुरक्षिततेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत कोरोनाशी दोन हात सुरू ठेवले आहेत. 

आशा वर्कर यांची मोलाची भूमिका
गावात सातत्याने घर टू घर सर्वे करणाऱ्या आशा वर्कर यांची मोलाची भूमिका आहे. बाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईनची सक्ती आहे. फॉगिंग व औषध फवारणी केली जाते. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय गावात पाहुण्यांना मनाई आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. ग्रामपंचायत प्रशासनाबरोबर ग्रामस्थांचेही सकारात्मक सहकार्य असल्यानेच आजपर्यंत कोरोनाला रोखू शकलो. 
- योगेश लोखंडे, सरपंच, गौंडवाडी 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 15 villages corona is still Outside; Strict enforcement of rules