उजनीचे 16 दरवाजे उघडले; भीमेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

धरणातील पाणीसाठा 70.23 टक्के झाला असून, सावधगिरीचा उपाय म्हणून धरणातून वीज निर्मितीसाठी 1600, कालव्यातून 3200, बोगद्यातून 1200 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले.

इंदापूर : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 1.75 मीटरने उचलून भीमा नदीत 70 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील 18 धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडत असल्याने दौंड येथून 2 लाख 18 हजार 253 क्‍युसेक पाणी भीमा नदीत मिसळत आहे. 4 ऑगस्ट रोजी 1 लाख 91, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 2 लाख 14 हजार, तर दुपारी 4 वाजता 2 लाख 18 हजार 253 क्‍युसेक पाणी धरणात आले. त्यामुळे धरणातील पाणी पातळी 495.400 मीटर झाली. धरणातील एकूण साठा 101.28 टीएमसी झाला असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 37.62 टीएमसी आहे.

धरणातील पाणीसाठा 70.23 टक्के झाला असून, सावधगिरीचा उपाय म्हणून धरणातून वीज निर्मितीसाठी 1600, कालव्यातून 3200, बोगद्यातून 1200 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. सायंकाळी 6 वाजता धरणातील पाणी पातळी 495.690 मीटर झाली. एकूण पाणीसाठा 104.36 टीएमसी, तर उपयुक्त 40.70 टीएमसी झाला आहे. धरणातील पाणी पातळी 75.97 टक्के झाली असून, भीमा नदीतून 71600 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनच्या वतीने अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर व सुनील म्हेत्रे यांनी दिली.

दरम्यान, उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 117 टीएमसी असून, धरणाची उंची वाढविल्याने ही क्षमता 123 टीएमसी झाली आहे. मात्र, गतवर्षी धरण क्षमतेने भरूनदेखील तेवढेच पाणी कर्नाटकला गेले. त्यामुळे नीरा- भीमा खोऱ्यातील सर्व पाझर तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, अंकुश पाडूळे, सुभाष काळे, मुकुंद शहा, किसनराव जावळे व बाळासाहेब मोरे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 doors of Ujani Dam opened alert to nearest villages of Bheema river