माफीच्या अपेक्षेने 168 कोटींची वीजबिले थकीत 

पोपट पाटील 
Saturday, 28 November 2020

कोरोना महामारी व लॉक डाऊनमुळे वीज माफ होईल या आशेने वाळवा तालुक्‍यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेती वीज ग्राहकांनी सुमारे 168 कोटी रुपयांची वीजबिले थकवली आहेत.

इस्लामपूर : कोरोना महामारी व लॉक डाऊनमुळे वीज माफ होईल या आशेने वाळवा तालुक्‍यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेती वीज ग्राहकांनी सुमारे 168 कोटी रुपयांची वीजबिले थकवली आहेत. ही थकबाकी अशीच वाढत राहिल्यास लोडशेडिंग वाढण्याबरोबरच महावितरण कंपनीचे भवितव्य देखील धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव सुरू झाला. त्यामुळे लॉक डाऊन होऊन सर्वच जीवनचक्र ठप्प झाले. नोकऱ्या, व्यवसाय, औद्योगिक कारखाने बंद राहिल्याने पैशाची अवाकच थांबली. मूलभूत गरजा भागविण्यासाठी सर्वसामान्यांची दमछाक झाली. त्यामुळे वीजबिल भरण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. प्रत्येक महिन्याबरोबर वीजबिलाच आकडा थकीत रकमेमुळे फुगतच राहिला. 

विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी वीजबिल माफी होण्यासाठी मागणी केली. त्यासाठी वीजबिल होळी, कार्यालया समोर निदर्शने अशी आंदोलने सुरू केली. सर्व सामान्यांना वीजबिल माफी होईल अशी आशा लागली. त्यामुळे प्रत्येकाने वीजबिल भरण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे. 

वीज खरेदी व दुरुस्तीसाठी वित्तीय तूट बाबत दरी तयार होत आहे, ती वित्तीय तूट भरून निघाली नाही तर महावितरणचे भवितव्य धोक्‍यात आहे. जनरेटर कंपनीने वीज पुरवठा बंद केला तर लोड शेडिंग वाढण्याची भीती आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे. 
- एस. बी. कारंडे. कार्यकारी अभियंता, वाळवा तालुका. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 168 crore electricity bills in arrears in anticipation of amnesty