"लालपरी' चे 17 कोटीचे उत्पन्न बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

सांगली-"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे "लालपरी' जागेवरच थांबली आहे. "कोरोना' मुळे सांगली विभागाचे 25 दिवसात सुमारे 17 कोटी रूपयाचे उत्पन्न बुडाले आहे. 

सांगली-"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे "लालपरी' जागेवरच थांबली आहे. "कोरोना' मुळे सांगली विभागाचे 25 दिवसात सुमारे 17 कोटी रूपयाचे उत्पन्न बुडाले आहे. 

राज्यात "कोरोना' चे रूग्ण मार्च महिन्यात वाढत असल्याचे पाहून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शाळा, महाविद्यालये बंद केल्याचे पाहून 14 मार्च रोजी राज्य परिवहन विभागाने सर्वत्र फेऱ्या कमी करण्यास सुरवात केली. सांगलीत 14 मार्च रोजी 6 हजार 36 पैकी 864 फेऱ्या रद्द केल्या. तसेच ज्या फेऱ्या सुरू होत्या त्यासाठी खबरदारी घेतली. लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये धूर आणि औषध फवारणी केली. चालक-वाहक आणि कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. 

14 मार्चनंतर "कोरोना' चे रूग्ण वाढत असल्याचे पाहून दररोज बंद होणाऱ्या फेऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे दररोज लाखो रूपयांचे उत्पन्न बुडत गेले. 22 मार्चपासून एसटी' च्या सर्वच गाड्या रद्द अखेर बंद करण्यात आल्या. केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांवर एसटी आगाराचे कामकाज सुरू राहिले. सांगली विभागातील दहा आगारातील दररोज 6 हजार 36 फेऱ्या होतात. पूर्णपणे एसटी बसेस बंद केल्यामुळे लालपरीचे दररोजचे साधारणपणे 70 ते 74 लाखाचे उत्पन्न बुडते. 

एसटी चे उत्पन्न गेल्या काही वर्षात घटत आहे. शासनाने एसटी महामंडळ चालवण्यासाठी ताब्यात घ्यावे अशी मागणी प्रलंबित आहे. तसेच इतर मागण्याही प्रलंबित आहे. एसटीचे उत्पन्न वाढण्याचा कालावधी म्हणजे उन्हाळी सुटी असते. या पार्श्‍वभूमीवर एक मार्चपासून "भारमान वाढवा' अभियान सुरू केले होते. 30 एप्रिलपर्यंत दोन महिन्याचा कालावधी देऊन उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले होते. परंतू मार्च महिन्यात दुसऱ्याच आठवड्यात "कोरोना' मुळे एसटीला फटका बसला आहे. गेल्या 25 दिवसात सुमारे 17 कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 
 
आठवड्यात 5 कोटीचा फटका- 
एसटीच्या सांगली विभागात रोजच्या 6036 फेऱ्यातून 2 लाख 71 हजार किलोमीटरचे अंतर कापले जाते. सरासरी 70 ते 75 लाख रूपये रोजचे उत्पन्न मिळते. या हिशोबाने आठवड्यात 5 कोटी 17 लाख रूपयाचे उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटीच्या सांगली विभागातून प्राप्त झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 crore loss of state transport in sangli