"एसटी'तील 170 स्वच्छता कामगार 7 महिने पगाराविना 

घनश्‍याम नवाथे
Friday, 24 July 2020

एसटी महामंडळाने राज्यातील बस स्थानके, कार्यालये आणि बसगाड्यांमधील स्वच्छतेसाठी ब्रिस्क इंडिया या कंपनीला कंत्राट दिले आहे.

सांगली : एसटी महामंडळाने राज्यातील बस स्थानके, कार्यालये आणि बसगाड्यांमधील स्वच्छतेसाठी ब्रिस्क इंडिया या कंपनीला कंत्राट दिले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात जवळपास 170 कामगार, सुपरवायझर, फिल्ड ऑफीसर कार्यरत आहे. या कामगारांचा डिसेंबर 2019 पासून पगार झाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांचे थकीत पगार सरकारने 31 जुलैपूर्वी करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट फोरमने दिला आहे. 

संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पांतर्गत एसटी कार्यालये, निवासस्थाने, स्थानके आणि बसगाड्यांच्या स्वच्छतेचा प्रकल्प 2017 मध्ये महामंडळाने हाती घेतला होता. चालक-वाहक विश्रांतीगृहे, स्थानकांतील स्वच्छतागृहांची स्वच्छता आदीसाठी ब्रिस्क इंडिया कंपनीला सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचे कंत्राट सरकारने दिले. मुंबई, नाशिक, अमरावती या विभागांत ब्रिस्क कंपनीने क्रिस्टल कंपनीला उपकंत्राट दिले आहे. जिल्ह्यात प्रत्येक बसस्थानकात सुपरवायझर, 8 ते 10 कामगार असे जवळपास 170 कामगार, फिल्ड ऑफिसर हे कार्यरत आहेत. त्यांचा पगार डिसेंबर 2019 पासून झालेला नाही. "लॉकडाउन' मुळे उपासमारीची वेळ आली आहे.

शासन व ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गैर कारभाराचा फटका कामगारांना बसत आहे. कंपनीला फायदा करून देण्यासाठी राज्यस्तरावर कंत्राट काढण्यात आले आहे. एसटी कामगारांच्या पगारासाठी महामंडळाकडे निधी नाही. डिझेल आणि ऑईलसाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. 

कंत्राटदार कंपनीचा निकृष्ट दर्जाचे कामाबाबत ठोठावलेला कोटीचा दंड शासन माफ करते. त्याचा ऑल इंडिया पॅंथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट फोरम तीव्र निषेध करते. स्वच्छता कामगारांचे थकीत पगार सरकारने 31 जुलै च्या आत करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट फोरमचे प्रमुख अमोल वेटम, मानतेश कांबळे, स्वप्निल खांडेकर यांनी दिला आहे. 
................ 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "170 cleaning workers in ST without pay for 7 months