मुकादमांकडून 18 लाखांना गंडा; तिघांकडून चार शेतकऱ्यांची फसवणूक

संतोष कणसे
Sunday, 3 January 2021

ऊसतोड मजूर पुरवतो, असे सांगून शेतकऱ्यांना 18 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा मुकादमांविरुद्ध आज कडेगाव आणि विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

कडेगाव, विटा (जि. सांगली) : ऊसतोड मजूर पुरवतो, असे सांगून शेतकऱ्यांना 18 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा मुकादमांविरुद्ध आज कडेगाव आणि विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत चार शेतकऱ्यांनी फिर्याद दाखल केली असून, यात एका मुकादमाने दोघा शेतकऱ्यांना फसवले आहे. 

नेवरी (ता. कडेगाव) येथील बबन मारुती महाडिक यांना ऊस तोडणी मजूर पुरवतो, असे सांगून मुकादम विकास अमरसिंह चव्हाण (वय 48, रा. सांगवी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने 20 मार्च 2020 ते 19 सप्टेंबर 2020 या कालावधीत 3 लाख रुपये रोख घेतले व 2 लाख रुपये "एनईएफटी'ने घेतले; परंतु त्यानंतरही महाडिक यांना ऊसतोड मजूर पुरवले नाहीत. त्यामुळे त्यांनी चव्हाणविरोधात 5 लाखांची फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी बबन महाडिक यांनी कडेगाव ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

तडसर (ता. कडेगाव) येथील सिद्धार्थ सर्जेराव पवार हे काम करीत असलेल्या कडेपूर (ता. कडेगाव) येथील यात्रा जागरी वर्क्‍स एलएलपी या कंपनीस ऊसतोडणी करता ऊसतोड मजूर व वाहने पुरवतो, असे सांगून सिद्धार्थ पवार यांच्याकडून मुकादम बंडू दादाराव पालकर (वय 38, रा. चारदरी, ता. धारूर, जि. बीड) याने 23 फेब्रुवारी 2018 रोजी कंपनीचे 3 लाख रुपये घेतले; परंतु त्यानंतर मजूर व वाहने पुरवली नाहीत. त्यामुळे फिर्यादी पवार यांनी पालकरविरोधात 3 लाखांच्या फसवणुकीबद्दल कडेगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे हे करीत आहेत.

दरम्यान, ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून दोन शेतकऱ्यांची दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार विटा येथे घडला आहे. याबाबत पतंगराव गणपती महाडिक (रा. नेवरी, ता. कडेगाव) व सावंता परसु माळी (रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) या शेतकऱ्यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार विकास अमरसिंग चव्हाण (रा. सांगवी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) व बाळू श्रीराम राठोड (रा. मारवाडी खुर्द, जि. यवतमाळ) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ही फसवणूक 10 ऑगस्ट 2015 व 21 एप्रिल 2020 या कालावधीत झाली, असे पोलिसांनी सांगितले. महाडिक यांच्याकडून चव्हाण याने ऊस तोडीसाठी सतावीस मजूर पुरवतो असे सांगून रोख 1 लाख 90 हजार व बॅंक खात्यावरून 3 लाख 10 हजार घेतले; तर माळी यांच्याकडून राठोड याने वीस ऊसतोड मजूर पुरवितो असे सांगून रोख पाच लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेऊनही मजूर पुरवण्यास दोघांनीही टाळाटाळ करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 lakhs from Mukadam; Four farmers cheated by three