सांगली जिल्ह्यातील152 ग्रामपंचायतींसाठी 1966 अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस

विष्णू मोहिते
Wednesday, 30 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उद्या ( ता. 30) शेवटची मुदत आहे. सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचयतींसाठी आज दत्त जयंतीच्या मुहुर्तावर 1505 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उद्या ( ता. 30) शेवटची मुदत आहे. जिल्ह्यातील 152 ग्रामपंचयतींसाठी आज दत्त जयंतीच्या मुहुर्तावर 1505 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

आजअखेर 1966 जणांनी 1988 अर्ज दाखल केले आहेत. सर्व्हर डाउनमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब, महा-ई सेवासह संगणक केंद्रावरील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास परवानगी दिली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत अडीच तासांनी वाढवून ती सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केली आहे. यामुळे उमेदवारांसह नेत्यांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत. महा-ई सेवा केंद्रासह अन्य संगणक केंद्रांवर झुंबड उडाली आहे. त्यातच निवडणूक आयोगाचा सर्व्हर डाउन झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. दोन-दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर अर्ज दाखल होत आहेत. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. उद्या (ता. 30) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने सर्वच हवालदिल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने रात्री उशिरा ऑफलाईन अर्ज दाखल करण्यासह सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली आहे. 

जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होत आहे. त्यात तासगाव तालुक्‍यातील सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. जत, मिरज, तासगाव या मोठ्या तालुक्‍यांत मोठी टशन पाहायला मिळत आहे. गावागावांत इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. 

साडेपाच वाजेपर्यंत वेळही वाढवलेली आहे

एकाचवेळी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व्हर संथ झाल्याबाबत जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला कळवले. आयोगाने शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्जासह सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळही वाढवलेली आहे. 
- गोपीचंद कदम, अतिरिक्त जिल्हाधिकारी, सांगली 

संपादन : युवराज  यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1966 applications filed for 152 gram panchayats in Sangli district; Today is the last day