भाजपचे 20 सदस्य स्थायीसाठी इच्छूक...पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य

बलराज पवार
Tuesday, 15 September 2020

सांगली-  स्थायी समिती सदस्य निवडीचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना देण्यात आले असून ते घेतील तो निर्णय मान्य असल्याची भूमिका आमच्या नगरसेवकांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात दोन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार यांनी दिली. 

सांगली-  स्थायी समिती सदस्य निवडीचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना देण्यात आले असून ते घेतील तो निर्णय मान्य असल्याची भूमिका आमच्या नगरसेवकांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात दोन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार यांनी दिली. 

माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृह येथे आज भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली. स्थायी समिती सदस्य निवड तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करणे यावर चर्चा झाली. यावेळी महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती संदीप आवटी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. 
श्री. इनामदार म्हणाले, बैठकीत स्थायी समिती सदस्य निवडीबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य करु अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. इच्छूक सदस्यांची नावे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना कळवण्यात येतील. त्यांच्याकडून गुरुवारी सायंकाळपर्यंत अंतिम नावे येतील. ती नावे शुक्रवारच्या महासभेत सादर केली जातील. 

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर या काळात सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये कोविड केअर सेंटरमध्ये फळे वाटप, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभागात दोन कार्यक्रम घेऊन ते पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. 

प्रशासनाबद्दल नाराजी 
बैठकीत सदस्यांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. महापालिकेत सत्ताधारी असूनही कोविडच्या कामात फक्त प्रशासनच राबत असल्याचे चित्र तयार केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थायी समितीने मंजुरी देऊन महापालिकेच्या पैशातून घेतलेली व्हेंटीलेटर्स खासगी रुग्णालयांना दिल्याबद्दलही काही सदस्यांनी तक्रार केली. 

व्यक्तीगत भेटींवर इच्छूकांचा भर 
स्थायी समितीसाठी इच्छूक सुमारे 20 सदस्यांनी बैठकीनंतर भाजप नेते शेखर इनामदार यांची भेट घेऊन आपल्यालाच संधी मिळावी अशी आग्रही मागणी केली. उपमहापौर आनंदा देवमाने, प्रकाश ढंग, गजानन आलदर, विनायक सिंहासने, उर्मिला बेलवलकर, सविता मदने, ऍड. स्वाती शिंदे, पांडुरंग कोरे, सोनाली सागरे, लक्ष्मी सरगर, जगन्नाथ ठोकळे आदींनी श्री. इनामदार यांची भेट घेतली. उपमहापौर देवमाने आणि ढंग हे दोघेही स्थायी सभापतीपदासाठी इच्छूक आहेत. उपमहापौर देवमाने यांनी स्थायी सदस्य मिळाल्यास उपमहापौरपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 BJP members want standing Committee. The decision will be taken by the party leaders