esakal | सांगलीत निकाल जाणून घेण्यासाठी पालकांची 'सत्वपरीक्षा'
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत निकाल जाणून घेण्यासाठी  पालकांची 'सत्वपरीक्षा'

सांगलीत निकाल जाणून घेण्यासाठी पालकांची 'सत्वपरीक्षा'

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : कोरोना संकटात मोबाईलवर ऑनलाईन गिरवलेले धडे आणि शिक्षकांनी त्यांच्याविषयी दाखवलेले ‘ममत्व’ या साऱ्याची बेरीज नेमकी किती झाली, याविषयी पालक फारच उत्सुक होते. दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले होते. पालक, विद्यार्थी मोबाईल घेऊनच बसले होते, मात्र निकाल काही लागता लागला नाही. त्यामुळे त्यांची घालमेल खूप वाढली होती. विद्यार्थी वेबसाईटवर अक्षरशः तुटून पडले होते. त्यांनी संपप्त ‘कमेंट’ही दिल्या.

अखेर जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी बोर्डाशी संपर्क साधून किमान जिल्ह्याच्या निकालाची परिस्थिती काय आहे, याची माहिती मिळवली आणि त्यातून जिल्ह्यात ९९.९२ टक्के असल्याचे जाहीर केले. व्यक्तिगत निकालाची प्रतीक्षा लांबता लांबता लांबे, अशीच राहिली. दहावीचा निकाल ९९.९२ टक्के लागला. खरेतर यंदाची शिक्षण, परीक्षा आणि निकालाची पद्धत ऐतिहासिक असल्याने निकाल १०० टक्केच लागेल, अशीच अपेक्षा होती. मात्र ३६ हजार ६११ पैकी २० जणांचे शैक्षणिक प्रवासातील पहिला मैलचा दगड पार करण्याचे स्वप्न भंगले. आता हे २० जण कोण आहेत आणि ते नेमके का ‘नापास’ झाले, त्यांचे ‘कर्तृत्व’ कुठे कमी पडले, याचे उत्तर मात्र समजू शकले नाही.

यावर्षी दहावीची परीक्षा झाली नाही. नववीतील गुणांच्या आधारे ३०, वर्षभरात शिक्षणातील सहभाग आणि सराव परीक्षेतील कामगिरीच्या आधारे ५० आणि शिक्षकांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे २० गुण अशी १०० गुणांची बेरीज करून निकाल जाहीर करण्यात आला. शिक्षकांच्या हाती असलेल्या या प्रक्रियेत शंभर टक्के निकालाचीच अपेक्षा होती. जवळपास ती पूर्णही झाली, मात्र तरीही २० विद्यार्थ्यांची कामगिरी ‘सुमार’ कशामुळे राहिली, याबद्दल स्पष्टता झाली नाही. कारण, त्यांचेही मूल्यांकन शाळांनी बोर्डाकडे पाठवले होते. १२ मुली आणि ८ मुले अनुत्तीर्ण झाली आहेत. पैकी एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेऊन हे विषय पुन्हा सोडवता येणार आहेत.

आकडे बोलतात...

  • - जिल्ह्यातील शाळा : ६३९

  • - एकूण विद्यार्थी : ३९ हजार ६३१

  • - मूल्यांकन सादर : १०० टक्के

  • - उत्तीर्ण : ३९ हजार ६११

  • - अनुत्तीर्ण : २०

१२ मुली, ८ मुले नापास

यंदा २१ हजार ७०१ मुलांपैकी आठ मुले नापास झाली, तर १७ हजार ९३० मुलींपैकी १२ नापास झाल्या. दरवर्षी परीक्षा होतात तेंव्हा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे सातत्याने अधिक राहिले आहे. यावेळी परीक्षा न होता जाहीर झालेल्या निकालात मात्र उलटी स्थिती समोर आली आहे.

loading image