ठरलं एकदाचं...कोल्हापूर रोडवर उभारणार 200 बेडचे हॉस्पीटल 

बलराज पवार 
Wednesday, 12 August 2020

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडून दोनशे बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी कोल्हापूर रोडवरील आदी सागर कार्यालयाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडून दोनशे बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी कोल्हापूर रोडवरील आदी सागर कार्यालयाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे. आमदार, महापौरांसह महापालिका पदाधिकारी यांच्या समवेत जागेची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. या कोविड हॉस्पिटलसाठी दानशूरांनी वस्तू स्वरूपात मदत करावी, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर वाढल्याने महापालिकेकडून 200 बेडचे कोरोना सुरू केले जाणार आहे. यासाठी काही दिवसांपासून जागेचा शोध सुरू होता. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदिसागर कार्यालयाच्या जागेची काल (सोमवारी) पाहणी केली होती. ती जागा योग्य वाटल्याने त्यांनी आज आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार आणि महापालिका पदाधिकारी यांना आज जागा दाखवली. या जागेत कोविड हॉस्पिटल कसे होऊ शकते याबाबत माहिती त्यांना दिली. त्यानंतर कोल्हापूर रोडवरील फळमार्केटसमोरील आदीसागर मंगल कार्यालयाची प्रशस्त जागा सर्वानुमते निश्‍चित करण्यात आली आहे. 

याठिकाणी महापालिकेकडून उद्यापासून 200 बेडचे कोविड हॉस्पिटलचे काम सुरु होणार आहे. यावेळी उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर, महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक, प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेविका स्वाती शिंदे, नगरसेवक संजय यमगर, विष्णू माने, शहर अभियंता आप्पा हलकुडे, उपअभियंता ऋतुराज यादव आदी उपस्थित होते.

सर्वानुमते आदीसागर हॉलची जागा कोविड हॉस्पिटलसाठी निश्‍चित करण्यात आली असून हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठा खर्चही अपेक्षित असल्याने दानशूर लोकांनी वस्तुरूपी मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या कोविड हॉस्पिटलला साहित्यरूपी मदत देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

विविध पदांची भरती 
महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्‍स रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आदी पदे भरण्यात येणार आहेत. एकूण किमान 46 आणि कमाल 135 पदे भरण्यात येणार आहेत. ही सर्व पदे तात्पुरत्या स्वरुपाची तीन महिन्यांसाठी असणार आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 bed hospital will be built on Kolhapur Road