2021-22 पासून शैक्षणिक वर्ष सुरु करा...

अजित झळके 
Friday, 27 November 2020

कोरोना संकट काळामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. शाळा बंद आहेत, त्या कधी सुरु होतील, माहिती नाही. हे चित्र असेच राहिले तर काय करायचे, याबाबत वरिष्ठ पातळीवर मंथन सुरु आहे.

सांगली : कोरोना संकट काळामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. शाळा बंद आहेत, त्या कधी सुरु होतील, माहिती नाही. हे चित्र असेच राहिले तर काय करायचे, याबाबत वरिष्ठ पातळीवर मंथन सुरु आहे. त्यात शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून 2020-21 शून्य शैक्षणिक वर्ष जाहीर करून 2021-22 या वर्षापासून आहे या स्थितीतून शिक्षण प्रणाली सुरु करावी, असा सूर पुढे आला आहे. त्याला जिल्ह्यातील शिक्षण संघटना, शिक्षण संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे आणि कोरोनापासून सुरक्षित राहणे या दोन्ही पातळीवर विचार करून याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. 

राज्यात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले. जिल्ह्यातील 80 टक्के शाळा सुरु झाल्या आणि सुमारे 30 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. हे प्रमाण वाढेल की असेच राहिल, हे पाहण्यासाठी काही काळ जावा लागेल. कारण, बेडगमध्ये कोरोना बाधित शिक्षक शाळेत आला आणि त्याने मुलांची ऑक्‍सिमीटरने तपासणी केली. असे प्रकार अन्य घडले तर? आता 36 शिक्षण कोरोना बाधित सापडले आहेत, त्याचे काय? असे अनेक प्रश्‍न एका सांगली जिल्ह्यात चर्चेला आले आहेत. 

राज्यभर परिस्थिती वेगवेगळी आहे. दिल्ली, गोव्यासह देशात अनेक ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र सावध आहे. शाळा सुरु ठेवाव्यात की नको, याबाबतचा पुनर्विचार केला पाहिजे, असे मत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही व्यक्त केला आहे. शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून घेण्याची मोकळीक शिक्षणंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या स्थितीत प्राथमिक शाळा सुरु होतील का, याबाबत शंकाच आहेत. 

माध्यमिक शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांत तर शिक्षणाची काठिण्य पातळी अलिकडे वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असा मुद्दा चर्चेत आहे. त्याबाबत केंद्र शासनाने देशभरासाठी एकच धोरण राबवावे आणि तसे झाले नाही तर किमान राज्य सरकारने आपल्या पातळीवर राज्यासाठी हे धोरण ठरवावे, असा मुद्दा पुढे रेटला जात आहे. 

शून्य शैक्षणिक वर्षाला आमचा पाठींबा आहे. जानेवारीत शाळा सुरु करून साध्य काय होणार? कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. मुलांपर्यंत झळ पोहचू नये, यासाठी राज्य शासन गंभीर आहे. त्यामुळे एक वर्ष शून्य ठरवणेच योग्य होईल. आता पाचवीला असणारा मुलगा जून 2021 मध्ये पुन्हा पाचवीच्या वर्गातूनच नवी सुरवात करेल. 
- विनायकराव शिंदे, अध्यक्ष, शिक्षक संघ 

मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, अशी शिक्षक समितीची भूमिका आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु करण्याला प्राधान्य राहिले पाहिजे. अगदीच अडचण झाली तर शून्य वर्षाचा विचार करावा.'' 
- बाबासो लाड, अध्यक्ष, शिक्षक समिती 

विद्यार्थ्यांचा पाया मजबूत व्हायचा असेल तर शिक्षणातील प्रत्येक वर्ष महत्वाचे असते. एक-दोन महिने वर्ग घेऊन ते साध्य होणार नाही, पुढच्या वर्गात नाहक दबाव येईल. त्यामुळे शिक्षणाबद्दल कोणताही खेळ करत न बसता हे शून्य वर्ष जाहीर करावे. 
- डॉ. भास्कर ताह्मणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2021-22 Passoon Academic Year Start ...