म्हैशाळजवळ 24 लाखांचा गांजा जप्त; मिरजेच्या तस्कराला अटक

राजेंद्र कोळी
Sunday, 27 September 2020

म्हैशाळजवळ 24 लाखांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मिरजेतील आशपाक मैनुद्दीन मुल्ला (वय 43, रा. दर्गा चौक, माळी गल्ली) याला ताब्यात घेतले आहे.

चिक्कोडी, सांगली : बेळगाव येथील डीसीआयबी पोलिस पथकाने आज म्हैशाळजवळ 24 लाखांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मिरजेतील आशपाक मैनुद्दीन मुल्ला (वय 43, रा. दर्गा चौक, माळी गल्ली) याला ताब्यात घेतले आहे. गांजा आणि मोटारीसह 28 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. 

बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक व अतिरिक्त अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निंगनगौडा पाटील व सहकाऱ्यांनी कारवाई केली. पोलिसांनी गांजाप्रकरणी (ता. 22) रोजी कारवाई करीत वशिम मैनुद्दीन शेख मुल्ला (रा. दर्गा चौक, माळी गल्ली, मिरज) याला अटक केली होती. त्याच्याकडून दोन किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आशपाकच्या तपासासाठी पोलिसांनी मिरज येथे (ता. 23) ला छापे टाकले होते. त्याने चौकशीत तेलंगना राज्यातील वारंगण व हैदराबाद येथील दोन व्यक्तींकडून गांजा खरेदी करुन त्याचा मिरज व परिसरात साठा करून ठेवल्याची कबुली दिली. या गांज्याची तो सांगली, मिरज, चिक्कोडी, बेळगाव, धारवाड परिसरात विक्री करत होता. त्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. 

या प्रकरणातील मुख्य संशयित आशपाकला म्हैशाळ (ता. मिरज) हद्दीत मोटार (एमएच -01- एएएल- 2174) व 40 किलो गांजाची पाकिटे जप्त केली. म्हैशाळ येथील पाणीपुरवठा प्रकल्पाकजवळ लपविलेली 78 किलो गांजाची पाकिटे व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

या गांजाची किंमत सुमारे 24 लाख रुपये होते. दोन किलो वजनाची गांजाची प्रत्येकी 60 पाकिटे (120 किलो), एक मोटार व दुचाकी असा एकूण 28 लाख 50 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. याची चिक्कोडी पोलिस ठाण्यात नोंद आहे. या प्रकरणातील तेलंगना येथील दोन संशयितांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. 

डीसीआयबीचे निरीक्षक निंगनगौडा पाटील, डी. के. पाटील, व्ही. व्ही. गायकवाड, टी. के. कोळची, अर्जुन मसगुप्पी, एल. टी. पवार, जयराम हम्मन्नवर, एस. एम. मंगन्नवर, एम. आय. पठाण यांनी ही कारवाई केली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 lakh cannabis seized near Mahishal; smuggler from Miraj arrested by karnataka police