प्राथमिक आरोग्य केंद्रांत 240 बेड, कोरोना बाधितांना तत्काळ प्रथमोपचाराची सोय - जितेंद्र डुडी

अजित झळके
Thursday, 17 September 2020

जिल्ह्यातील 59 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 240 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी चार बेड असून काही दिवसांत आणखी चार-चार बेडची व्यवस्था होईल.

सांगली ः जिल्ह्यातील 59 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 240 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी चार बेड असून काही दिवसांत आणखी चार-चार बेडची व्यवस्था होईल. कोरोना बाधित रुग्णांवर गावातच प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार उपस्थित होते. 

श्री. डुडी म्हणाले, ""कोरोना बाधितांची वाढती संख्या, वाढलेला मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषद महत्वाची पावले उचलत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना या प्रक्रियेत आणले आहे. येथे ऑक्‍सिजन बेड आणि फेवीपिरॅवीर गोळ्या उपलब्ध केल्या आहेत. रुग्णाचे वय, व्याधी, प्रकृती पाहून त्या गोळ्या तेथे दिल्या जातील. जेणेकरून ऑक्‍सिजन प्रमाण कमी आलेल्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील. त्यांना रुग्णालय शोधत भटकावे लागणार नाही. त्यातून स्थिर होणाऱ्यांना होम आयसोलेट केले जाईल आणि प्रकृती फार चिंताजनक वाटली तर सांगली, मिरज किंवा उपलब्ध कोविड रुग्णालयात दाखल केले जाईल. आतापर्यंत येथे 63 रुग्ण दाखल झाले होते. पैकी 30 रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुढे पाठवण्यात आले. अन्य घरी पाठवले गेले. मानवी उपलब्धता ही मोठी अडचण आहे. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहकार्य केल्यास येथे रुग्णांना अधिक चांगली सेवा देता येईल. त्यासाठी गावातील नेत्यांनी पुढे यावे. ऑक्‍सिजन सिलेंडर उपलब्धतेसाठी सहकार्य करावे. विविध संस्थांना त्यासाठी मदत करावी.'' 

ते म्हणाले, ""तालुका स्तरावर कोअर सेंटर सुरु केली आहेत. जिल्हा परिषदेत टेलिमेडीसीन सेंटर सुरु आहे. रुग्णांना मानसिक आधारही दिला जातोय. त्यांनी घाबरू नये. शंका वाटली की तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही महत्वाची मोहिम आहे. त्यातून बाधितांना ओळखण्याची गती वाढेल. लवकर उपचार सुरु होतील. मृत्यूदर आटोक्‍यात आणता येईल. याकामी काही स्वयंसेवकांची गरज आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 240 beds in primary health centers, immediate first aid facility for corona sufferers - Jitendra Dudi