"त्या' महिलेच्या संपर्कातील 26 जण क्वारंटाईन, वाचा कुठे?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील 50 वर्षीय महिलेच्या संपर्कातील 26 जणांना संस्थात्मक क्वांटाईनसाठी नेण्यात आल्याने गावात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ढालगाव : कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील 50 वर्षीय महिलेच्या संपर्कातील 26 जणांना संस्थात्मक क्वांटाईनसाठी नेण्यात आल्याने गावात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपर्कातील आकडा अजून वाढण्याची शक्‍यता आहे. 

कदमवाडी येथील चौघेजण नवी मुंबई येथून कदमवाडी येथील आपल्या गावाकडे 17 मे ला आले होते. गावात आल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांना होमक्‍वारंटाईंन केले होते. तब्बल सोळा दिवसांनंतर घरातील 50 वर्षीय महिलेला लक्षण दिसू लागल्याने मिरज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर घरातील मुलालाही मिरज येथे नेण्यात आले आहे. तर सून व सासऱ्यास कवठेमहांकाळ येथे संस्थात्मक क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. त्या तिघांचीही तपासणी आज करण्यात येणार आहे. 

दरम्यान, मुंबई येथून कदमवाडी येथे आल्यानंतर होमक्‍वारंटाईंन असतानाही घरातील सदस्यांनी गावात संपर्क ठेवला होता. दहा किलोचा केक आणून मोठा वाढदिवस साजरा करून पार्टी केली होती. घरातच पंन्नास लोकांना जेवण दिले होते. तर महिलेचा खोकला कमी होत नाही म्हणून एका दुसऱ्या महिलेकडून पडजीभ दाबून घेतली होती. असे कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

संपर्कात आलेल्यापैकी घरातील 23 व बाहेर गावातील ढालेवाडी, कांचनपूर व वाळेखिंडी येथील प्रत्येकी एक असे आत्तापर्यंत 26 जणांना तपासणीसाठी नेण्यात आले असून गावात एक किलोमीटर कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून गावात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, विस्तार अधिकारी संजय शिर्के, ग्रामसेवक विकास झांबरे, मंडलाधिकारी शुभद्रा कुंभार, गावकामगार तलाठी सुनील सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांनी गावात भेटी देऊन माहिती घेण्याचे काम सुरू आहे. गावातील दक्षता समितीचे पांडुरंग कदम, माजी सरपंच सुभाष खांडेकर, सतीश कदम, चंद्रकांत कदम हे गावात प्रशासनास सहकार्य करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The 26 people in contact with that woman are quarantined