
तासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची विचित्र कोंडी झाली आहे. लॉकडाऊन मुळे राज्यभरात 300 कोटींची सुमारे 25 हजार टन बेदाण्याची उलाढाल पूर्ण ठप्प झालेली आहे. शिवाय उत्पादन वाढणार असल्याने उत्पादन खर्च तरी निघणार काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
एक अभूतपूर्व अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बेदाणा उत्पादक शेतकरी सापडला आहे. हंगामाच्या सुरवातीला द्राक्ष उत्पादन कमी, द्राक्षाला वजन न येण्यामुळे बेदाणा उत्पादन कमी होण्याच्या शक्यता होती. मात्र 22 मार्च पासून बाजारपेठाच बंद झाल्याने द्राक्ष विक्री थांबली. जिल्ह्यासह राज्यात दहा हजार एकरावर द्राक्षे शिल्लक असल्याने त्याचा आता बेदाणा करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. परिणामी बेदाणा उत्पादन तर वाढणारच आहे.
बेदाणा उत्पादन वाढल्यास दर मिळणार काय हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सध्या सरासरी 160 ते 200 रुपये किलो असा दर मिळतो आहे. बेदाण्याचे उत्पादन वाढल्यास दर कोसळण्याची भीती आहे. सध्या असलेल्या दरापेक्षा कमी दर मिळाल्यास उत्पादन खर्चही निघणेही अशक्य होणार आहे. एकूणच पुढचे वर्ष हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जिकिरीचे असणार आहे. गतवर्षीचा शिल्लक बेदाणा आणि यावर्षीचा वाढणारा बेदाणा याचा मोठा ताण पुढे वर्षभर बेदाणा मार्केटवर रहाणार हे नक्की आहे. पावसामुळे छाटण्या लांबल्याने बेदाणा हंगाम एक महिना पुढे गेला होताच पण अचानक बेदाण्याची द्राक्षे वाढल्याने आणखी लांबणार आहे.
निर्यातीबाबतही अनिश्चितता
शीतगृहे सध्या 60 टक्के भरलेली आहेत, प्रत्येक शीतागृहावर दररोज सरासरी 5 हजार बॉक्सची आवक सुरू झालेली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील बेदाणा आवक सुरू आहे. त्यात हा वाढीव बेदाणा ठेवायचा कुठे? हा प्रश्न निर्माण होणार आहे. बेदाण्याचे दर ही कसे रहाणार हे आज सांगता येणे शक्य नाही. बेदाण्याची गतवर्षी निर्यात 5 हजार टन झाली होती यावर्षी एकूण जगातील परिस्थिती पाहता बेदाणा निर्यातीबाबतही अनिश्चितता आहे. याचा ही बेदाणा दरावर परिणाम होऊ शकतो. चांगल्या दर्जेदार बेदाण्याला चांगला दर मिळेल पण परंतु टेबलटॉप मार्केटची द्राक्षे आणि निर्यातक्षम द्राक्षापासून बनलेल्या बेदाण्याला दर मिळेलच असे नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.
सौदे बंदच...
गतवर्षी राज्यात 1 लाख 80 हजार टन बेदाण्याचं उत्पादन झाले होते. यावर्षी टेबलटॉप द्राक्षही बाजारपेठा उपलब्ध नसल्याने बेदाणा होणार असल्याने 2 लाख ते सव्वा दोन लाख टन बेदाणा उत्पादन होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन काळात बेदाणा सौदे बंद असल्याने 25 हजार टन (2500 गाडी) बेदाण्याचे सौदे होऊ शकले नाहीत. फक्त तासगाव बाजारपेठ बंद असल्याने 900 गाडी बेदाणा सौदे होऊ शकलेले नाहीत. सांगली, सोलापूर पंढरपूर बाजारपेठाही बंद आहेत.
शेतकऱ्यांना 160 दर मिळाला तरच...
शेतकऱ्याला 160 रुपयांवर बेदाण्याला दर मिळाला तर परवडू शकेल अशी सध्याची परस्थिती निर्माण झालेली आहे. द्राक्षे 120 रुपये 4 किलो, बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्याला सरासरी 40 रुपये खर्च येतो. त्यातच लॉकडाऊन मुळे बेदाणा बॉक्स, डिपिंग ऑइल, गंधक आणि अन्य गोष्टींचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून येत्या आठवडाभरात वस्तुची उपलब्धता होईल, असे आश्वासन दिले जात आहे. मात्र ते वेळेत उपलब्ध झाल्यास काहीसा दिलासा मिळेल.
नवीन बेदाणा उत्पादन वाढणार
नव्या बेदाणा बाजारात येणे सुरू झाल्यानंतरही जुना बेदाणा शिल्लक होता, महत्त्वाचे सण गेले आहेत. आता सर्व बाजारपेठ सुरळीत होण्यास किती वेळ लागेल हे सांगणे अशक्य आहे. जुना बेदाणा शिल्लक होता नवीन बेदाणा उत्पादन वाढणार आहे. बाजारात मंदी आहे. परिणामी पुढे बेदाणा दर कसे रहातील हे सांगणे अशक्य आहे.
- संजय बोथरा, उपाध्यक्ष सांगली तासगाव बेदाणा मर्चंटस् असोसिएशन.
बंपर उत्पादन होण्याची शक्यता
बेदाणा तयार करण्यासाठी रॅक मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. बेदाणा कोल्ड स्टोअरेज भरू लागली आहेत. लॉकडाऊन काळात खूप मोठ्या अडचणी शेतकऱ्यांसमोर होत्या मात्र, प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील 44 शीतागृहांची साठवण क्षमता सुमारे 60 हजार टनांची आहे. सध्या स्टोरेजवर दररोज सरासरी 4 ते 5 हजार बॉक्स अशी आवक सुरू आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी सारखी बंपर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
- अजय पाटील, शीतगृह चालक तासगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.