36 गावांना मिळणार हक्‍काचे पाणी? आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या खानापूर मतदारसंघातील 36 गावांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा विभागांची मुख्यमंत्री कक्षात शुक्रवारी (ता. 24) बैठक बोलावली असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली. 

आटपाडी : टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या खानापूर मतदारसंघातील 36 गावांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा विभागांची मुख्यमंत्री कक्षात शुक्रवारी (ता. 24) बैठक बोलावली असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली. 

आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा पाणी उपसा सिंचन योजना म्हणून टेंभू योजनेची ओळख आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील 80 हजार हेक्‍टर क्षेत्र पहिल्या टप्प्यातील नियोजनात भिजणार होते. या योजनेपासून खानापूर मतदारसंघातील 36 गावे वंचित राहिली आहेत. त्यांना हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार श्री. बाबर यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न चालू केले आहेत. धरणात शिल्लक पाण्यावर वचित गावाचे पाणी आरक्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या कक्षामध्ये बैठक बोलावली आहे.

गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून चांदोली धरणात वर्षभर वापरून 5 ते 10 टीएमसी पाणी शिल्लक राहते. तसेच पुराच्या वेळातील पाणी वाहून जाते. कृष्णा, वारणा धरणातील शिल्लक पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.

वाटपातून 10 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. ते दुष्काळी भागातील वंचित गावांना द्यावेत यासाठी आमदार श्री. बाबर यांनी राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून जोरदार प्रयत्न केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही टेंभूच्या पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा, अशीही मागणी केली असल्याचे बाबर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 villages get water of claim? Meeting with the Chief Minister today