पानटपऱ्या, मद्यालये सुरु...वाचनालये बंद...जिल्ह्यातील 377 ग्रंथालये अजूनही "लॉकच'

अजित कुलकर्णी 
Tuesday, 14 July 2020

सांगली-  टाळेबंदीमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता चित्रपटगृहे, मॉल यासह करमणुकीच्या ठिकाणांवर गंडांतर आले. तंबाखू, मावा, मद्यप्रेमी टाळेबंदीदरम्यान हतबल झाल्याचे चित्र होते. मात्र दबाव व मागण्या वाढताच दारु दुकाने काही अटींवर सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली. मात्र अभिजन वर्गासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या वाचनालयांना गेल्या चार महिन्यांपासून लागलेले टाळे अद्यापही कायम आहे.

सांगली-  टाळेबंदीमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता चित्रपटगृहे, मॉल यासह करमणुकीच्या ठिकाणांवर गंडांतर आले. तंबाखू, मावा, मद्यप्रेमी टाळेबंदीदरम्यान हतबल झाल्याचे चित्र होते. मात्र दबाव व मागण्या वाढताच दारु दुकाने काही अटींवर सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली. मात्र अभिजन वर्गासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या वाचनालयांना गेल्या चार महिन्यांपासून लागलेले टाळे अद्यापही कायम आहे.

एकीकडे चैनीच्या वस्तू, पेय पानासाठी शासन परवानगी देते; तर दुसरीकडे टाळेबंदीदरम्यान वाचन संस्कृतीला "अच्छे दिन' येत असताना मात्र ग्रंथालये, वाचनालये उघडण्यास चालढकलीचे धोरण अवलंबल्याने निराशा आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या भयाने गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश निघाले. चित्रपटगृहे, मॉल, बगीचा, जिम, बाजारपेठांसह देवालयांनाही टाळे लागले. कडकडीत लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून एप्रिल, मे महिन्यात पूर्णपणे व्यवहार थांबले होते. प्रशासनाच्या आवाहनामुळे आबालवृध्दांसह घरीच थांबून असल्याने वाचनासाठी वेळच वेळ होता. टीव्ही, मोबाईलमध्ये रममाण होण्यासाठीही मर्यादा होत्या. अनेकांनी घरी वाचन सुरु केले. वाचनालये बंद असल्याने पुस्तके उपलब्ध होत नव्हती. 

मद्यालये व पानटपऱ्यांबाबत शासनाने लवचिक धोरण ठेवत लोकांच्या मागणीनुसार ती खुली केली. मात्र बंद वाचनालये सुरु करण्याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. बुध्दिवादी वर्ग, नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी मागणी करुनही शासन चालढकल करत असल्याने नाराजी आहे. 

अनलॉकमध्ये वाचनालयांना काय अडचण ? 
सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करुन वाचकांना किमान पुस्तकांची देवघेव करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे. वाचनालयात बसून वाचन करणे कोरोनामुळे अशक्‍य आहे. लॉकडाउनमध्ये उलट वाचनासाठी लोकांना वेळ होता. त्यानिमित्ताने वाचन चळवळीला बळ मिळाले असते. मात्र ती संधी गमावली. बाजारपेठा, दुकाने, लग्नासाठी परवानगी आहे. त्या धर्तीवर अनलॉकमध्ये वाचनालये सुरु करुन वाचनसेवेची संधी उपलब्ध करुन द्यावी. 
-चि.कृ.जोग, उपाध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, भिलवडी 

कोरोना संसर्गाची भिती 
कोरोनामुळे राज्यभरातील वाचनालये गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. जिल्ह्यात 377 ग्रंथालये असून अनेक ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावेच बंद आहेत. त्यामुळे वाचनालये बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरीच थांबण्याच्या सूचना असल्याने काही दिवस त्यांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. शासन आदेश आल्यानंतर सर्व ग्रंथालये,वाचनालयांशी संपर्क साधून सूचना देउ. 
- आ.मु.गलांडे, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली 

 

 

संपादन : घनशाम नवाथे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 377 libraries in the district are still "locked"