सांगली : आमदार सुमनताई, बाबर, अधीक्षक शर्मा पॉझिटिव्ह; जिल्ह्यात 39 मृत्यू 

जयसिंग कुंभार
Sunday, 6 September 2020

सांगली जिल्ह्यात आज नवे 612 रुग्ण आढळले, तर 39 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 36 जण जिल्ह्यातील आहेत.

सांगली : जिल्ह्यात आज नवे 612 रुग्ण आढळले, तर 39 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 36 जण जिल्ह्यातील आहेत. आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील विद्यमान सहा आमदारांना कोरोनाची बाधा झाली. दिलासादायक म्हणजे जिल्ह्यात आज 316 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. 

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांचा तीन दिवसांपूर्वी चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, घरीच क्वारंटाईन असलेले आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील आणि पुत्र रोहित पाटील यांना आज दुपारी पुणे येथे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. तेथे आमदार सुमनताईंची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले. पोलिस अधीक्षक शर्मा घरीच क्वारंटाईन असून, त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत, तर आमदार बाबर यांच्यावरही घरीच उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती चांगली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून, मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. जिल्ह्यात 751 जणांची प्रकृती नाजूक आहे. कडेगाव, शिवणी, आमणापूर, मणेराजुरी, तासगाव, शिंदेवाडी (मिरज), शिरटे (वाळवा), आष्टा, जरंडी, आटपाडी, तांदुळवाडी, शेंडगेवाडी, एरंडोली, कसबे डिग्रज, पलूस, तासगाव, दुधगाव, नांद्रे, हरिपूर, कवठेमहांकाळ, बागणी, कापूसखेड, इस्लामपूर येथील रहिवासी रुग्णांचा जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रात सांगलीतील दोन, कुपवाडमधील एक, तर मिरजेतील पाच जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये बहुतेक ज्येष्ठ असून, पाच जण 45 ते 50 वयोगटातील आहेत. 

जिल्ह्यात आज 635 आरटीपीसीआर चाचण्यांमधून 167 नवे रुग्ण मिळाले; तर प्रतिजन एक हजार 466 चाचण्यांमधून 462 रुग्ण आढळले. केवळ महापालिका क्षेत्रात 228 नवे रुग्ण पुढे आले. जिल्ह्याबाहेरील नवे 17 रुग्ण आज जिल्ह्यात उपचारांसाठी दाखल झाले. यात कऱ्हाडमधील दोघांचा, तर जयसिंगपूरमधील एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 

 • नवे रुग्ण- 612 
 • उपचारांखालील रुग्ण- 6927 
 • आजअखेरचे बरे झालेले रुग्ण- 8702 
 • आजअखेरचे मृत- 633 
 • आजपर्यंतचे बाधित रुग्ण- 16262 
 • चिंताजनक रुग्णसंख्या- 751 
 • आजअखेरचे ग्रामीण भागातील बाधित- 6280 
 • आजअखेरचे शहरी भागातील बाधित- 1916 
 • आजअखेरचे महापालिका क्षेत्रातील बाधित- 8066 

  संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 39 dead by Corona in Sangali, 612 new positive