...म्हणून शिवसेनेला सोलापुरातील चार जागा गमवाव्या लागल्या

तात्या लांडगे
Sunday, 27 October 2019

तानाजी सावंत यांनी त्यावर ठोस उपाय काढण्याऐवजी ठेवलेल्या भिजत घोंगड्यामुळे विजयाची खात्री असलेल्या करमाळा, बार्शी, मोहोळ व शहर मध्यची जागा शिवसेनेला गमवावी लागली.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला जिल्ह्यात पाचही जागांवर विजय मिळविण्याची नामी संधी होती. तत्पूर्वी, उमेदवारी नाकारल्याने होणाऱ्या बंडखोरीचा अंदाज असतानाही संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी त्यावर ठोस उपाय काढण्याऐवजी ठेवलेल्या भिजत घोंगड्यामुळे विजयाची खात्री असलेल्या करमाळा, बार्शी, मोहोळ व शहर मध्यची जागा शिवसेनेला गमवावी लागली.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीच्या करमाळ्यातील नेत्या रश्‍मी बागल, मोहोळचे भाजप नेते नागनाथ क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी ऐन निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी मिळणार जवळपास तेव्हाच निश्‍चित झाले होते. मात्र, त्या जागांवर पूर्वीपासूनच इच्छुक असलेल्या नेत्यांनी हक्‍क सांगितला होता.

संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर सावंत यांनी पदाधिकाऱ्यांची मोट बांधली. मात्र, कार्यकर्त्यांना विचारात न घेताच उमेदवारीच्या हालचाली सुरु केल्या. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्यास या जागांवर बंडखोरी होऊ शकते, अशी शक्‍यता असतानाही सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांची समजूत काढली नाही.

महेश कोठे यांनी 18 नगरसेवकांसह 'मातोश्री' गाठली अन्‌ उमेदवारीची मागणी केली. मात्र, त्यांना ठोस आश्‍वासन न मिळाल्याने त्यांनी अखेर बंडखोरी केली. तर नारायण पाटील यांना विद्यमान आमदार म्हणून उमेदवारी अपेक्षित असतानाही त्यांना डावलले.

राज्यात महायुती झाली असतानाही बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेच्याच उमेदवारासमोर आव्हान उभे केले. या सर्व गोष्टींची भणक लागूनही संपर्कप्रमुखांनी त्यावर योग्यवेळी उपाय न काढल्याचा फटका
शिवसेनेला बसल्याची चर्चा आहे.

प्रणिती शिंदेंच्या विजयात भाजप-सेनेचा 'हात'!

महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद घेणाऱ्या महेश कोठे यांना उमेदवारीची आशा होती. तत्पूर्वी, शिवसेनेत प्रवेश केल्याने दक्षिण सोलापुरातील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वाटेतील प्रमुख अडथळा दूर झाला.

शहर मध्यमध्ये मात्र, कोठे यांच्या माध्यमातून दिलीप माने यांनाच अडथळा निर्माण झाला. कोठे यांना शहर उत्तरमधून अपक्ष अथवा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठी संधी असतानाही त्यांनी शहर मध्य मतदारसंघ निवडला. या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असतानाही माने यांना पराभव पत्करावा लागला.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि कॉंग्रेसमधील नाराजांच्या बळावर आपला विजय निश्‍चित अशी खात्री असतानाही माने यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी हॅट्रिक केली. आमदार शिंदे यांच्या विजयात भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य नेत्यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 Seats of Solapur lost by Shivsena