पावसाचा प्रकोप : जिल्ह्यातील 420 गावांत अतिवृष्टी; - 90 मार्गावरील वाहतूक बंद

विष्णू मोहिते
Friday, 16 October 2020

कमी दाबाचा पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने सांगली जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. वेगाने वाहणारे वारे, ढगफुटीमुळे कृष्णानदीसह ओढे-नाल्यांना जोरदार पाणी आले.

सांगली ः कमी दाबाचा पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. वेगाने वाहणारे वारे, ढगफुटीमुळे कृष्णानदीसह ओढे-नाल्यांना जोरदार पाणी आले. ऊस, द्राक्ष, केळी, उडीद, सोयाबीन, भुईमूग, डाळिंब, भाजीपाल्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेत, शिवारात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. 

जिल्ह्यातील 60 मंडलांतील महसुली 702 गावांपैकी 420 गावांत अतिवृष्टी झाली आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे ओढे-नाल्यातून पाणी पात्राबाहेर पडले. जिल्ह्यातील 90 पुलांवर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवावी लागली. राज्य व जिल्हा 90 मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागले. अनेक गावांतील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. घरांची पडझड सुरू आहे. बिसूर, एरंडोलीसह काही गावांच्या संपर्कात अडथळे आले आहेत.

कोयना धरणातून 35 हजार क्‍युसेक व चांदोलीतून 2514 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयनेतील विसर्गामुळे सांगलीतील आयर्विन पुलावर सायंकाळी सात वाजता 36 फूट पाणीपातळी झाली होती. ती उद्यापर्यंत 38 फुटांवर जाण्याची शक्‍यता असून, प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. अलमट्टी धरणातून 1.50 लाख क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवला आहे. 

जिल्ह्यात बुधवारी (ता. 14) सकाळी आठ वाजता सुरू झालेला पाऊस गुरुवारी पहाटे चार वाजता कमी झाला. यामध्ये केवळ दीड तासाची उसंत मिळाली. आज दिवसभर हलका पाऊस झाला, मात्र गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसामुळे ओढे-नाल्यातून पाणी पात्राबाहेर पडले. जिल्ह्यातील 90 पुलांवर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवावी लागली. 

दृष्टिक्षेप 

  • सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर 
  • दहा पैकी 8 तालुक्‍यांत अतिवृष्टी 
  • 60 मंडलातील 420 गावांत अतिवृष्टी 
  • पावसाच्या उघडीपीनंतर पंचनामे होणार सुरू 
  • नदीपात्रात नागरिकांना न जाण्याचे आवाहन 
  • पावसामुळे अनेक घरांची पडझड 

मदतीसाठी सज्जतेचे आदेश 
महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांसह आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत व अन्य आवश्‍यक मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिले आहेत. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष राज्यातील जिल्हा कक्षांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून समन्वय राखत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 420 villages in the district received heavy rains in Sangali; Traffic closed on 90 lanes