इस्लामपुरात कारवाईचा 43 जणांना दणका; कारवाईसाठी इस्लामपुरात पथक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इस्लामपूर नगर परिषदेकडून आज दंडात्मक कारवाईस सुरवात करण्यात आली.

इस्लामपूर (जि. सांगली) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इस्लामपूर नगर परिषदेकडून आज दंडात्मक कारवाईस सुरवात करण्यात आली. त्याचा 43 नागरिकांना आज पहिल्याच दिवशी दणका बसला. पालिकेकडून ही कारवाई सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आज सकाळपासून पालिकेच्या पथकामार्फत कारवाई सुरू करण्यात आली. यात 43 नागरिकांकडून सुमारे 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक जागेत विनामास्क फिरणे, मास्क परिधान न केलेल्या ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, पार्सलची सुविधा उपलब्ध करून न देता ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून पदार्थ देणे या प्रकारच्या कृतीबद्दल संबंधितांवर कारवाई करण्यात आली. 

याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी प्रज्ञा पवार म्हणाल्या, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढेही दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच आवश्‍यक कारणासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य राहील. नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे. ही कारवाई करणाऱ्या पथकात स्वतः मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार, उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील, राजाराम खांबे, साहेबराव जाधव, अनिकेत हैंद्रे, अमोल बल्लाळ, विष्णू माळी, पोलिस विभागाचे महादेव खोत व होमगार्ड श्री. सपाटे यांचा समावेश होता. 
 
दंडात्मक कारवाई करण्याचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा 

शहरात विनामास्क फिरणाऱ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर तसेच उघड्यावर कचरा टाकल्यास, थुंकल्यास पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व पावसाळ्यात पसरणारी रोगराई रोखणसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी सांगितले. यासाठी पालिका स्वतंत्र पथक तयार करणार आहे. 

"कोविड-19'च्या प्रतिबंधात्मक उपाययोजांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 च्या अनुषंगाने पालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेलतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने याची लवकरच कार्यवाही सुरु होणार आहे. तत्पूर्वी पालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना याची पूर्वकल्पना देण्यात आल्याचे मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले. यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरल्यास व व्यवसाय केल्यास, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास 100 रुपये, घंटागाडीत कचरा न टाकता इतरत्र टाकल्यास 180 रुपये, उघड्यावर मैला टाकल्यास एक हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास 200 रुपये, उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये, बंदी असलेल्या प्लॅस्टीकचा वापर केल्या, 5 हजार ते 25 हजार रुपये, सामुदायिक हॉल चालकांची उघड्यावर कचरा टाकल्यास 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

कठोर निर्णयांची गरज
नागरिकांना स्वच्छतेबरोबरच नियमांचे पालन करण्याची सवय लावण्यासाठी काही कठोर निर्णयांची गरज आहे. दंडात्मक कार्यवाही सुरू करण्याआधी शहरवासीयांना याची कल्पना देण्यात आली आहे. लवकरच शहरात ही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येईल. 
- प्रज्ञा पवार, मुख्याधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 43 people fine without mask in Islampur; Squad form for action