अबब ! कर्नाटकातील कोरोनाबाधितांमध्ये 45 टक्के युवक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

कर्नाटक राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तब्बल 45 टक्‍के युवक असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे लहान मुलांसह वृद्धांबरोबरच आता युवापिढीलाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

 

बंगळूर, ता. 24 : राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच आणखी आणखी एक धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तब्बल 45 टक्‍के युवक असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे लहान मुलांसह वृद्धांबरोबरच आता युवापिढीलाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

एचसीजी रुग्णालयाच्या डॉ. यू. एस. विशालराव आणि सुब्रमण्यम यांच्या पथकाने 244 प्रकरणांच्या केलेल्या अभ्यासात ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. 20-49 वर्षे वयोगटातील लोकांचे प्रमाण एकूण नमुन्यांपैकी 60 टक्के आहे. यापैकी 20-39 वर्षांच्या व्यक्तींमध्ये त्वरीत संसर्ग होण्याची लक्षणे असून या वयोगटाचे प्रमाण 45 टक्के आहे. तथापि, अधिक प्रतिकारशक्ती असल्याने या वयातील रुग्ण लवकर बरे झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. संक्रमित व्यक्तीला बरे होण्यासाठी सरासरी 17.5 दिवस लागतात. 50-59 वयोगटातील व्यक्तीला बरे होण्यासाठी सरासरी 19.6 दिवस लागून बरा होण्याचा दर 23 टक्के आहे. 60-69 वर्षांचे लोक बरे होण्याचे प्रमाण खूपच कमी असून 70-80 वर्षांचे 22 टक्के लोक बरे झाले आहेत. या गटातील मृत्यूचे प्रमाण 30.76 टक्के आहे. 

गेल्या एका आठवड्यापासून राज्यात संसर्ग वाढत असून अवघ्या 9 दिवसांत बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. 14 मे रोजी 27 रुग्णांची नोंद झाली असून संक्रमणाची संख्या वाढून 987 झाली. पहिल्या 980 प्रकरणांमध्ये 9 मार्च ते 14 मे दरम्यान संसर्ग होण्यास 65 दिवस लागले. पुढे केवळ नऊ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट झाली. 14 मेपासून केवळ 9 दिवसांत 980 रुग्णांना संसर्ग झाल्याची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 1,959 वर पोहोचली आहे. देशाच्या सरासरीपेक्षा राज्यातील रुग्णांचे प्रमाण 5.6 टक्‍क्‍यावरुन 10 टक्‍के झाली आहे. 

वेगाने संसर्ग

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर युवक इकडे तिकडे फिरत आहेत. त्यामुळे त्यांना खूप वेगाने संसर्ग होताना दिसून येत आहे. ते लवकर बरे होऊ शकतात; परंतु घरी असलेल्या वृद्धांना त्यांच्याकडून संसर्ग झाल्यास त्रासदायक होत असल्याचे एचसीजी रुग्णालयातील डॉ. यू. एस. विशालराव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 per cent of the corona victims in Karnataka youth