कोरोना काळातील बेळगाव महानगरपालिकेची 'ही' आहे गुड न्यूज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

'कोरोना' काळातच बेळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांची 'मेगा बढती' झाली असून तब्बल 47 जणांना बढती देण्यात आली आहे. महापालिकेतील तृत्तीय व चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याना असून जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी हे 30 मे रोजी बढतीचे आदेश दिले आहेत.

बेळगावः 'कोरोना' काळातच बेळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांची 'मेगा बढती' झाली असून तब्बल 47 जणांना बढती देण्यात आली आहे. महापालिकेतील तृत्तीय व चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याना आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी हे महापालिकेचे प्रशासकही असून त्यांनीच 30 मे रोजी बढतीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांना फेब्रुवारी महिन्यात अधीक्षक अभियंता या पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर मे महिन्यात महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर बढती मिळाली होती. आता एकाचवेळी 47 जणांना बढती मिळाली आहे. त्यामुळे कोरोना काळातही महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सुखद बातमी मिळाली आहे. मे महिन्याचे वेतन 30 मे रोजीच पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करून सुखद धक्‍काही देण्यात आला होता. आता आणखी एक सुखद धक्का पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. 

महसूल विभागात करवसुली सहाय्यक म्हणून सेवा बजावणाऱ्या तिघांना प्रथम दर्जा महसूल निरीक्षक या पदावर बढती मिळाली आहे. त्यात सागर कांबळे, यल्लेश पोतेन्नावर व श्रुती चलवादी यांचा समावेश आहे. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून म्हणजेच सहाय्यक, रखवालदार, दफेदार म्हणून सेवा बजावणाऱ्या आठ जणांना द्वितीय दर्जा सहाय्यक या पदावर बढती देण्यात आली आहे. त्यात लक्ष्मण कलपत्री, प्रशांत उर्फ परशुराम कोलकार, सुरेश आलूर, जाफर सादीक मुनियार, सुरेश कांबळे, वाय नागराज, अब्दुल सनदी, बसवराज कोलकार यांचा समावेश आहे. महापालिकेतील उद्यानात माळी म्हणून सेवा बजावणाऱ्या दोघांना बढती देण्यात आली आहे. वरिष्ठ माळी या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यात संभाजी तुपे व आनंद कोलकार यांचा समावेश आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या सहा जणांची चालक या पदावर बढती झाली आहे. यामध्ये संजय कंग्राळकर, गणेश मैलन्नावर, संदीप मंडलिक, चन्नबसू कोलकार, मारूती कोलकार व अरूण कांबळे यांचा समावेश होता. हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून विविध पदावर काम करीत होते, पण यापुढे ते चालक म्हणून काम पाहणार आहेत. 

 सफाई कामगार, लोडर, क्‍लीनर अशी चतुर्थ श्रेणीतील विविध कामे करणाऱ्या तब्बल 25 जणांना एकाचवेळी आरोग्य पर्यवेक्षक म्हणून बढती मिळाली आहे. अनेक वर्षांपासून हे सर्वजण बढतीच्या प्रतिक्षेत होते, आता त्यांचे बढतीचे स्वप्न साकार झाले आहे. तृतीय श्रेणीत म्हणजे द्वितीय दर्जा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या महापालिकेतील तिघांची प्रथम दर्जा सहाय्यक या पदावर बढती झाली आहे. त्यात ख्वाजा सय्यद मुन्शी, सुरेश लिंबीकाई व बसवराज बागलकोट यांचा समावेश आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 47 persons from Belgaum Municipal Corporation have been promoted