जिल्ह्यात आत्तापर्यंत "जीएसटी'ची 481 कोटीची वसुली

जयसिंग कुंभार 
Thursday, 24 December 2020

कोरोनाच्या संकटकाळाने जिल्ह्यातील "जीएसटी'चे आत्तापर्यंतचे संकलन गतवर्षीच्या तुलनेत साडेबारा टक्के इतके कमी आहे. मात्र येत्या तीन महिन्यांतील संभाव्य कर संकलनाचा विचार करता यंदा गतवर्षी इतके संकलन नक्की होईल असा आशावाद जीएसटी विभागाच्या वतीने करण्यात आला.

सांगली : कोरोनाच्या संकटकाळाने जिल्ह्यातील "जीएसटी'चे आत्तापर्यंतचे संकलन गतवर्षीच्या तुलनेत साडेबारा टक्के इतके कमी आहे. मात्र येत्या तीन महिन्यांतील संभाव्य कर संकलनाचा विचार करता यंदा गतवर्षी इतके संकलन नक्की होईल असा आशावाद जीएसटी विभागाच्या वतीने करण्यात आला. चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 481 कोटी इतकी जीएसटी वसुली पूर्ण झाली आहे. गतवर्षी 813.42 कोटी इतके जीएसटी संकलन होते. 

जीएसटी लागू झाल्यापासून दरवर्षी संकलनात वाढच होत आहे. सुरवातीचा विस्कळीतपणा कमी होऊन आता त्यात सुसूत्रता येत आहे. जिल्ह्यात 25 हजार 500 जीएसटी नोंदणीधारक आहेत. सुरवातीला सुमारे तीस हजार इतकी नोंदणी संख्या होती. मात्र शासनाने 40 लाखांपर्यंत उलाढाल असणाऱ्या वस्तू उत्पादक नोंदणीधारकांना तसेच 20 लाखांपर्यंतची उलाढाल असणारे सेवाक्षेत्रातील करदात्यांना जीएसटी कक्षेतून वगळले आहे. त्यामुळे दोन वर्षाच्या अनुभवानंतर या अटीतील अनेक नोंदणीधारकांची नोंदणी बंद झाली. ज्यांनी रिटर्न्स भरले नाहीत अशा सुमारे अडीच हजार जणांचेही नोंदणी क्रमांक रद्द करण्यात आले. 

गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात जिल्ह्यात 813 कोटी 42 लाख रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या काळात अनुक्रमे 73.89 कोटी, 69.34 कोटी, 63.95 कोटी, 55.61 कोटी इतके कर संकलन होते.

आता येत्या डिसेंबरपासून पुढील मार्चपर्यंत गतवर्षी इतकेच करसंकलन होईल असा अंदाज आहे. तसे झाले तर यंदाही 813 कोटींइतक्‍या उद्दिष्टापर्यंत करसंकलन होईल, असा विश्‍वास जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ""सध्याच्या संकटकाळातही करदात्यांनी प्रामाणिकपणे कर भरून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. सर्वच क्षेत्रातील संकलन आता नव्याने चांगली गती पकडत आहे. त्यामुळे उद्दिष्टापर्यंत कर संकलन होईल.'' 

" जीएसटीतील केंद्राचा आणि राज्याचा वाटा समान म्हणजे पन्नास टक्के इतका असतो. त्यामुळे जिल्ह्यातील करदात्यांकडून राज्याला आणि केंद्राला समान म्हणजे प्रत्येकी चारशे कोटींचा कर दिला जातो. बाजारपेठेतील हालचाल पाहता येत्या तीन महिन्यांत आम्ही नक्की उद्दिष्ट पूर्ण करू.'' 
- किशोर गोयल, सहाय्यक आयुक्त, केंद्रीय जीएसटी विभाग

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 481 crore of GST has been recovered in the district so far