जिल्ह्यात नवे 481 रूग्ण... 21 जणांचा मृत्यू : रूग्णसंख्येने दहा हजाराचा टप्पा ओलांडला 

घनश्‍याम नवाथे
Friday, 28 August 2020

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात 481 कोरोना बाधित रूग्ण आढळले. यापैकी महापालिका क्षेत्रातील रूग्ण संख्या 235 इतकी आहे. त्याखालोखाल वाळवा तालुक्‍यात 75 तर तासगाव तालुक्‍यात 54 रूग्ण आढळले. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज दहा हजाराचा टप्पा पार केला. आजअखेर 10 हजार 422 इतकी रूग्णसंख्या झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील 18 आणि परजिल्ह्यातील 3 अशा 21 जणांचा मृत्यू झाला.

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात 481 कोरोना बाधित रूग्ण आढळले. यापैकी महापालिका क्षेत्रातील रूग्ण संख्या 235 इतकी आहे. त्याखालोखाल वाळवा तालुक्‍यात 75 तर तासगाव तालुक्‍यात 54 रूग्ण आढळले. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज दहा हजाराचा टप्पा पार केला. आजअखेर 10 हजार 422 इतकी रूग्णसंख्या झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील 18 आणि परजिल्ह्यातील 3 अशा 21 जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 29 जुलै ते 28 ऑगस्ट या महिनाभरात तब्बल 8 हजार 357 रूग्ण वाढले आहेत. तर महिनाभरात 358 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात रूग्णसंख्या वाढीचा वेग आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होऊ लागली आहे. आजही दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीत 143 आणि ऍन्टीजेन चाचणीत 352 याप्रमाणे एकुण 495 रूग्ण आढळले. यापैकी 481 रूग्ण जिल्ह्यातील आणि 14 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत.

दिवसभरात महापालिका क्षेत्रात 235 रूग्ण आढळले. त्यापैकी 188 सांगलीतील आणि 47 मिरजेतील आहेत. त्या खालोखाल वाळवा तालुक्‍यात 75, तासगाव तालुक्‍यात 54, मिरज 31, पलूस 21, आटपाडी 18, खानापूर 16, कवठेमहांकाळ 14, शिराळा 13, जत 4 याप्रमाणे रूग्ण आढळले. तर कडेगाव तालुक्‍यात आज कोरोना बाधित रूग्ण आढळले नाहीत. 

आज जिल्ह्यात 18 रूग्ण कोरोनामुळे मृत झाले. त्यामध्ये सांगलीत तीन महिला व दोन पुरूष, मिरज तालुक्‍यात महिला व पुरूष, कवठेएकंद, जत, गोटेवाडी (ता. जत), नवेखेड, रेठरेधरण, बागणी, येलूर (ता. वाळवा), नागठाणे (ता. पलूस), आटपाडी, मणेराजुरी (ता. तासगाव), इस्लामपूर येथील रूग्णाचा समावेश आहे. तर परजिल्ह्यातील जयसिंगपूर, हेरवाड आणि कराड येथील रूग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात 245 रूग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत 532 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यांना ऑक्‍सिजन व व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर होम आयसोलेशनमध्ये 1785 रूग्ण आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण- 10422 
  • सध्या उपचार घेणारे रूग्ण- 3701 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 6293 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 428 
  • परजिल्ह्यातील मृत रूग्ण- 99 
  • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक- 532 
  • ग्रामीण भागातील रूग्ण- 3531 
  • शहरी भागातील रूग्ण- 937 
  • महापालिका क्षेत्र रूग्ण- 5954 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 481 new patients in the district. 21 died : the number of patients crossed the ten thousand mark