esakal | सांगलीसह साळसिंगे, भिकवडीत नवे 5 रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

5 new corona patients in Sangli

सांगली  जिल्ह्यात आज एकाच दिवशी एकूण पाच नवे रुग्ण आढळल्याने जिल्हा हाय अलर्टवर आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येने अर्धशतक गाठले आहे.

सांगलीसह साळसिंगे, भिकवडीत नवे 5 रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात आज एकाच दिवशी एकूण पाच नवे रुग्ण आढळल्याने जिल्हा हाय अलर्टवर आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येने अर्धशतक गाठले आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, 32 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर उर्वरित 17 रुग्णांवर उपचार सध्या सुरू आहेत. आज साखर कारखाना परिसरातील लक्ष्मीनगर, साळसिंगे (ता. खानापूर) येथे प्रत्येकी एक, तर भिकवडी (ता. कडेगाव) येथे तीन रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक म्हणजे दुधेभावी येथील रुग्णांच्या कुटुंबातील पत्नी, भाचीसह घोरपडीतील तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

लक्ष्मीनगरमध्ये नव्याने रुग्ण 
महापालिका क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत रेव्हेन्यू कॉलनीतील दोन, फौजदार गल्लीतील एक आणि मिरजेतील एक, असे चार रुग्ण आढळून आले आहेत. आज कारखाना परिसरातील लक्ष्मीनगर येथे रुग्ण आढळला. बावन्न वर्षीय या रुग्णाच्या बाधेचा इतिहास स्पष्ट नाही. रात्री उशिरा महापालिकेचे आरोग्य पथक परिसरात दाखल झाले असून, हा परिसर सील करण्यात आला आहे. सोशल मीडियामधून या रुग्णाचे मुंबई कनेक्‍शन असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तो प्रवासादरम्यान दुधेभावीच्या बाधिताच्या संपर्कात आल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. तथापि जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी मात्र त्याला दुजोरा दिला नाही. 

साळसिंगेत मुलास लागण 
विटा : साळसिंगे (ता. खानापूर) येथील आठ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. गावातील सहा जणांचे एक कुटुंब काही दिवसांपूर्वी अहमदाबादहून परतले होते. त्यातील महिलेस विटा ग्रामीण रुग्णालयात तपासणीअंती बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिच्या पतीस मिरज कोविड रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला. या कुटुंबातील 15 पैकी 14 जण निगेटिव्ह आले, तर कुटुंबातील 8 वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा मुलगा बाधित महिलेचा नातेवाईक आहे. तहसीलदार ऋषीकेश शेळके यांनी ही माहिती दिली. 

भिकवडीत तिघांना लागण 
कडेगाव : भिकवडी खुर्द येथील दहा वर्षांच्या बाधित मुलाच्या संपर्कात आलेल्या येथील 14 जणांपैकी त्याचे आजोबा, चुलती व चुलत बहीण असे एकूण 3 जणांच्या कोरोनाचा अहवाल आज रात्री पॉझिटिव्ह आला आहे. 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. आज सलग दुसऱ्या दिवशी भिकवडी खुर्द येथील 3 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याने गावातील बाधितांची संख्या चारवर पोचली. अहमदाबाद (गुजरात) येथून खानापूर तालुक्‍यातील साळसिंगे येथे आलेल्या महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी (ता.4) येथे आली होती. तोच त्यांचा संपर्काचा दुवा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन व आरोग्य विभागाने भिकवडी खुर्द येथे धाव घेवून साळसिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द येथील पती पत्नी व त्यांची दोन मुले असे एकूण चौघांना स्वॅब घेतले. त्यात मुलास लागण झाल्याचे समोर आले. आज आणखी तिघांना लागण झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांनी दिली. 

दुधेभावीतील व्यक्‍ती पुन्हा पॉझिटिव्ह; तिघांना डिस्चार्ज 
सांगली : मुंबईहून दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथे मामाकडे आलेल्या 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर चौदा दिवसानंतर पुन्हा त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्या बाधिताच्या संपर्कातील पत्नी आणि कुपवाड वाघमोडेनगरमधील सतरा वर्षीय भाचीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच मुंबईहून घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे आलेल्या कोरोनाबाधिताचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मिरजेतील 24 निगेटिव्ह 
मिरजेतील होळी कट्टा परिसरात 68 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे तातडीने स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

जिल्ह्यातील स्थिती 

  • एकूण पॉझिटिव्ह- 50 
  • बरे झालेले रुग्ण- 32 
  • उपचार घेणारे रुग्ण- 17 
  • मृत्यू - 1