लोकवर्गणीतून साकारणार कवठेपिरानमध्ये 50 बेडचे रुग्णालय 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

कवठेपिरान (ता. मिरज) येथे जिल्ह्यातील पहिले 50 बेडचे कोरोना प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र आरोग्य विभाग, खासगी डॉक्‍टर आणि लोकवर्गणी यातून सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांनी दिली. 

तुंग (सांगली) : कवठेपिरान (ता. मिरज) येथे जिल्ह्यातील पहिले 50 बेडचे कोरोना प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र आरोग्य विभाग, खासगी डॉक्‍टर आणि लोकवर्गणी यातून सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांनी दिली. 

ते म्हणाले,""गेल्या काही दिवसांपासून मिरज पश्‍चिमसह कवठेपिरान गावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने उपचाराअभावी गावकडे हाल होत आहे. तसेच ताप, सर्दी, खोकला असे किरकोळ आजाराच्या रुग्णांची देखिल हेळसांड सुरू आहे. उपचाराअभावी रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे गावातील रुग्णांचे उपचार गावातच व्हावेत या उद्देशाने रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे.'' 

माने म्हणाले,""कवठेपिरान आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या केंद्रासाठी जागा निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हे केंद्र सुरू होईल. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत परंतु, ज्यांना लक्षणे नाहीत अथवा सौम्य लक्षणे आहेत आणि कोरोना संशयित रुग्णांचे उपचार या ठिकाणी केले जाणार आहेत. रुग्णाला ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर लावण्याची आवश्‍यकता पडेल, अशा स्थितीपर्यंत जाण्याअगोदर उपचार करणे, हा केंद्र स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे.'' 

 

ते पुढे म्हणाले,""कवठेपिरान आणि कसबे डिग्रज सर्कलमध्ये येणाऱ्या गावातील रुग्णांचा उपचार देखील या ठिकाणी करण्याची तयारी आहे. त्यांसाठी काही डॉक्‍टर, नर्सेस व इतर काही वैद्यकीय साहित्याची आवश्‍यकता आहे. यासाठी लवकरच पालकमंत्री जयंत पाटील व खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून याबाबत मागणी करणार आहे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 50-bed hospital will be set up in Kavthepiran