सांगली बाजार समितीत दिवसभरात 50 कोटीची उलाढाल ठप्प 

घनश्‍याम नवाथे 
Saturday, 22 August 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेरील शेतीमाल व्यवहार नियमनमुक्त करण्याच्या आदेशाच्या विरोधात आज बाजार समितीने लाक्षणिक संप केला.

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेरील शेतीमाल व्यवहार नियमनमुक्त करण्याच्या आदेशाच्या विरोधात आज बाजार समितीने लाक्षणिक संप केला. सांगलीतील मुख्य बाजार समिती, फळ मार्केट आणि मिरज, कवठेमहांकाळ व जत दुय्यम बाजार येथील व्यवहार ठप्प होते. दिवसभरात 50 कोटीची उलाढाल ठप्प झाली. दरम्यान सभापती दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले. 

केंद्र शासनाने 5 जून 2020 रोजी अध्यादेश काढला आहे. त्यानुसार बाजार समिती आवाराबाहेर होणारा शेतीमालाचा व्यवहार नियमनमुक्त केला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पणन संचालकांना दिले आहेत. बाजार समितीचा कायदा अस्तित्वात ठेवताना आवाराबाहेरील शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवर समितीला बाजार फी मिळणार नाही. वास्तविक बाजार समित्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा बाजार फी असून त्या व्यतिरिक्त कोणतेही अनुदान किंवा आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे नियमनमुक्ती झाल्यास बाजार समित्यांना शेतकऱ्यांना सोई-सुविधा देण्यात अडचणी येतील. तेव्हा अध्यादेशाचा फेरविचार करावा तसेच त्याला विरोध म्हणून राज्यातील बाजार समित्यांनी आज लाक्षणिक संप पुकारला होता. 

सांगलीतील मुख्य बाजार समिती, कोल्हापूर रस्ता येथील फळ मार्केट आणि मिरज, कवठेमहांकाळ व जत येथील दुय्यम बाजार आवारातील सर्व व्यवहार बंद होते. सभापती श्री. पाटील यांनी आवाहन केल्यामुळे शेतकऱ्यांनी चारही ठिकाणी शेतीमाल विक्रीसाठी आणला नव्हता. दिवसभरात सर्व व्यवहार बंद असल्यामुळे शुकशुकाट जाणवत होता. 

जवळपास 50 कोटीची उलाढाल दिवसभरात ठप्प राहिली. दरम्यान सभापती श्री. पाटील आणि शिष्टमंडळाने केंद्र शासनाचा आदेशाबाबत फेरविचार करून शेतकरी व सर्व बाजार घटकांना न्याय मिळवून द्यावा, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना दिले. माजी आमदार प्रा. शरद पाटील, हमाल पंचायत नेते विकास मगदूम, संचालक बाळासाहेब बंडगर, वसंतराव गायकवाड, आदगोंडा गौंडाजे, प्रभारी सचिव आर.ए. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 crore turnover in Sangli market committee during the day