चित्रे विकून 51 हजार मुख्यमंत्री सहाय्यता निधी

निरंजन सुतार
Monday, 25 January 2021

आरग (ता. मिरज) येथील जग प्रसिद्ध रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी कोरोना काळात रेखाटलेली चित्रे विकून 51 हजार रुपयांचा रोख निधी शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करीत त्यांनी अनेक चित्रे काढली होती.

आरग : आरग (ता. मिरज) येथील जग प्रसिद्ध रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी कोरोना काळात रेखाटलेली चित्रे विकून 51 हजार रुपयांचा रोख निधी शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करीत त्यांनी अनेक चित्रे काढली होती. स्वागत मूल्य देऊन अनेकांनी ती खरेदी केली. जमा झालेली एकूण रक्कम बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केली. 

रांगोळीच्या माध्यमातून 23 वर्ल्ड बुकात आदमअली मुजावर यांच्या नावाची नोंद आहे. कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालयात ते कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. लॉक डाऊन मध्ये रेखाटलेली चित्रे विकून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा त्यांचा मानस होता. एक कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय नेते शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, कृषी व सहकार मंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत हा निधी सुपूर्द करण्यात आला. 

देशाचा नागरिक म्हणून त्यांना काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यांना रांगोळी व चित्र रेखाटने करण्याची कला होती. अनेक महामानवांची व्यक्ती चित्र रेखाटली. छत्रपती शिवाजी महाराज, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, भगवान बसवेश्वर महाराज, छत्रपती संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर आदींची चित्रे रेखाटली. यासाठी कॅनवास रंग वापरण्यात आला. दीडशे ते दोनशे वर्षे या चित्रे टिकतील. डॉ. सी. आर. सांगलीकर, अमर पाटील, सरपंच रामचंद्र वाघमोडे, प्रदीप येवले आदींचे सहकार्य लाभले. त्यांच्या आर्ट गॅलरीला माजी मंत्री अजितराव घोरपडे, सभापती दिनकर पाटील, एसपी मनीषा दुबोले, शिक्षण अधिकारी सुधाकर तेलंग, महेश चोथे, अनेक व्यक्तींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. 

देशासाठी काहीतरी करण्याची अशा होती. लॉकडाऊन मध्ये गेली नऊ महिने रात्रंदिवस कष्ट केले. चित्र विकून 51 हजार रुपयांचा निधी जमा केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शरद पवार साहेब यांना सुपूर्द केला. 
- आदमअली मुजावर, रांगोळीकार

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 thousand CM assistance fund by selling paintings