63 हजार शेतकऱ्यांनी भरला 34 हजार हेक्‍टरवरील विमा 

विष्णू मोहिते 
Wednesday, 5 August 2020

जिल्ह्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वगळून राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

सांगली : यंदाच्या खरीपातील पिकांचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (31 जुलै) संपली. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक ठेवली होती. जिल्ह्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वगळून राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील 63 हजार शेतकऱ्यांनी 34 हजार 221 हेक्‍टरवरील विमा भरल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली. 

लॉकडाऊन, सर्व्हर डाऊनच्या फटक्‍यातही शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये चांगला प्रतिसाद दाखवला आहे. यामुळे विमा योजनेला मुदतवाढीची शक्‍यता धूसर असणार आहे. विमा योजना ऐच्छिक असल्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसूचीत पिकांसाठी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधित बॅंकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्‍यक होते. 

आजच्या आकडेवारीवरून कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या खात्यातून विमा रक्कम कपात केली जावू नये याची दक्षता घेतल्याचे जाणवते आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांतील केवळ 168 शेतकऱ्यांनीच विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्याचे क्षेत्र केवळ 270 हेक्‍टर आहे. या उलट बिगर कर्जदार 62 हजार 295 शेतकऱ्यांनी 33 हजार 951 हेक्‍टरवरील पिकांसाठी विमा भरला आहे. 

तालुकानिहाय शेतकरी संख्या व विमा उतरवलेले क्षेत्र ( हेक्‍टरमध्ये) असे- 
आटपाडी- 5685 व 3338, 
जत- 43261 व 26462, 
कडेगाव- 366 व 151, 
कवठेमहांकाळ-1950 व 840, 
खानापूर- 4725 व 1437 , 
मिरज- 482 व 220, 
पलूस- 19 व 7.74, 
शिराळा- 19 व 2.64, 
तासगाव- 6131 व 1651, 
वाळवा- 433 व 112. 

जिल्हा बॅंकेतील शेतकऱ्यांसह हा आकडा लाखावर जाणार आहे. राज्यासह जिल्ह्यातही पिक विम्यासाठी यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिलायन्स जनरल कंपनीकडे हा विमा भरला आहे. त्या कंपनीने जिल्हाभर केलेल्या जागृतीमुळे योजना ऐच्छिक असतानाही चांगली प्रतिसाद मिळाला. 
- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 63 thousand farmers paid insurance on 34 thousand hectares