
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत कर्जपुरवठा केल्या जाणाऱ्या 766 विकास सोसायट्यांपैकी 752 सोसायट्यांतील 91 हजार 705 सभासदांकडे तब्बल 695 कोटी रुपये थकबाकी आहे.
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत कर्जपुरवठा केल्या जाणाऱ्या 766 विकास सोसायट्यांपैकी 752 सोसायट्यांतील 91 हजार 705 सभासदांकडे तब्बल 695 कोटी रुपये थकबाकी आहे. वसुलीसाठी थकबाकीदार सभासदांची "कलम 101'प्रमाणे प्रकरणे करण्याच्या सूचना सांगली जिल्हा बॅंकेने जिल्हा उपनिबंधक यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास 10 वर्षांनंतर "101'च्या कारवाईसाठी जिल्हा बॅंकेने पावले उचलली आहेत. त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणीही केली आहे.
जिल्हा बॅंकेमार्फत सभासद असलेल्या जिल्ह्यातील 766 विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा केला जातो. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. या धोरणामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बॅंकेमार्फत कर्जपुरवठा केलेल्या विकास सोसायट्यांची थकबाकी वाढतच चालली आहे.
सोसायट्यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढतच चालला आहे. काही विकास सोसायट्यांची मेंबर पातळीवरील वसुलीची टक्केवारी 30 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. वसुलीचे प्रमाण कमी होत राहिल्यामुळे सहकारी संस्थांची वाटचाल धोक्याकडे चालली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सन 2019 आणली. या योजनेतून जिल्ह्यातील 62 हजार 717 सभासदांना 341 कोटी 33 लाख रुपये अल्पमुदत पीक कर्ज थकबाकीचा लाभ मिळाला. त्यानंतरही थकबाकी आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या बहुसंख्य सभासदांची मध्यम व दीर्घ मुदत कर्जाची थकबाकी राहिल्यामुळे त्यांना खरीप सन 2020 मध्ये पीक कर्ज वाटपास अडचणी निर्माण झाल्या. तसेच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील सोसायटीच्या 91 हजार 705 सभासदांची थकबाकी 695 कोटी रुपये इतकी झाली आहे. बॅंकेने गेल्या दहा वर्षांत वसुलीसाठी "कलम 101'चा वापर केला नव्हता, परंतु सोसायट्यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आता 101 नुसार वसुलीसाठी कारवाई करावी, यासाठी जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी जिल्हा उपनिबंधकांना सूचना केल्या आहेत.
सर्व तालुक्यातील सहायक निबंधक, विकास सोसायटी सचिव व अध्यक्षांना थकबाकीदारांवर 101 ची प्रकरणे करण्यासाठी सूचना कराव्यात. तसेच प्रकरणे दाखल करून घेऊन प्रमाणपत्र लवकर देण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रमाणपत्र लवकर मिळाल्यास विशेष वसुली अधिकारी हे सक्तीने व प्रभावीपणे थकबाकी वसुली करतील, असे श्री. कडू यांनी कळवले आहे.
संपादन : युवराज यादव