कोरोनातील 70 टक्के मृत्यू मधुमेह रुग्णांचे...डेथ ऑडिटमधील निष्कर्ष : वयापाठोपाठ विविध विकार कारणीभूत 

corona dead.jpg
corona dead.jpg

सांगली- जिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या प्राथमिक पातळीवरील डेथ ऑडिटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुमारे 70 टक्के मृत्यूला मधुमेह हे प्रमुख कारण ठरले. पन्नास वर्षांवरील रुग्णाला मधुमेह असेल तर कोरोनाने त्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी ही माहिती दिली. 

जिल्ह्यात 16 सप्टेंबरअखेर 969 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सुमारे 650 हून अधिक रुग्णांना मधुमेह असल्याचे समोर आले. वय हा महत्त्वाचा मुद्दा यात आहेच, मात्र सोबतीला मधुमेह, हायपर टेन्शन, किडनी आणि लिव्हरचे विकार अशा क्रमाने आजार घातक ठरल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या टप्प्यावर वयस्कर आणि मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष आणि अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले. 

जिल्ह्यात 25 हजार 653 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 969 जणांचा बळी गेला असून, त्यात पन्नाशीवरील रुग्णांची संख्या 90 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. जिल्ह्याचे मृत्यू प्रमाण 3.77 टक्के इतके असून, ते देशात सर्वाधिक आहे. या स्थितीत मृत्यूची कारणमीमांसा करताना रुग्णांना असलेले विविध आजार हे प्रमुख कारण म्हणून समोर आले आहे. 

डॉ. पोरे म्हणाले, ""आजवरच्या कोरोना मृतांमध्ये वय आणि सोबतीला मधुमेहाचे कारण समोर आले आहे. सुमारे 70 टक्के मृत लोकांना मधुमेह होता. त्यानंतर हायपर टेन्शनचे कारण आहे. काही रुग्णांना मधुमेह आणि हायपर टेन्शन दोन्ही आजार होते. मधुमेहामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. फुफ्फुसाला अधिक वेगाने इजा होते. त्यामुळेच जिल्ह्यातील 94 वर्षांच्या आजी वाचल्या, कारण त्यांना मधुमेह किंवा अन्य आजार नव्हते.'' 

जीवनशैली बदला 
डॉ. राजेंद्र भागवत म्हणाले, ""आक्रमकपणे मधुमेह नियंत्रणात आणणे ही पद्धत अलीकडे यशस्वी होतेय, मात्र ती पद्धत भारतीय तज्ज्ञांनी अजून स्वीकारलेली नाही. त्यात वजन कमी करणे, हा उत्तम उपाय आहे. पाच ते दहा किलोने ते कमी केले पाहिजे. चार-सहा महिन्यांत हे केलेच पाहिजे. आहारात प्रोटिन्स खूप वाढवावेत, कार्बोहायड्रेटस्‌ कमी करावेत, गोड नसलेली फळे, भाजीपाला, कडधान्ये यावरच जगायचे आहे, हे स्वीकारले पाहिजे. अर्धी भाकरी व उर्वरित सगळे उसळी, पालेभाजी असेच जेवण ठेवायला हवे. भरपूर चालले पाहिजे. दीर्घकाळ चालणे, सायकलिंग करणे फायद्याचे आहे. औषधांचे योग्य नियोजन ठेवावे, तज्ज्ञांचा सल्ला घेत राहावे, हेच महत्त्वाचे. इन्सुलिन हे या काळात उपयुक्त ठरते, हे मान्य करावे लागेल.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com